ठाणे शहरात धुळवडीचा उत्साह
शहरात धुळवडीचा ‘रंगोत्सव’
विविध सोसायट्या आणि सार्वजनिक उत्सवांना ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे, ता. ३ (बातमीदार) : ढोल-ताशांचा गजर, डीजेचा ठेका, रेन डान्स आणि रंगांची मुक्त उधळण अशा अत्यंत उत्साही वातावरणात आज ठाणे शहरात धुळवड साजरी करण्यात आली. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच ठाणेकर रंगात न्हाऊन निघाले होते. विशेषतः यंदा ‘फेस पेंटिंग’च्या क्रेझने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सोमवारी भक्तिभावाने होलिका दहन झाल्यानंतर, मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासूनच ठाण्यातील गृहसंकुले, चाळी आणि चौकाचौकांत धुळवडीचा आनंद पाहायला मिळाला. उपवन आणि मासुंदा तलाव परिसरात तरुणाईने मोठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी ‘थंडाई’ आणि ‘जिलेबी-फाफडा’च्या मेजवानीचा बेत आखण्यात आला होता. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाही ठाणेकरांनी मोठी उपस्थिती लावली.
मोठ्या इव्हेंट्सची धूम
शहरात अनेक ठिकाणी भव्य होळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वृंदावन सोसायटीत ‘रंग जल्लोष २०२६’अंतर्गत नैसर्गिक रंगांचा वापर करून पर्यावरणपूरक होळीचा संदेश देण्यात आला. कचराळी तलाव येथे नगरसेवक राजेश मोरे यांच्यातर्फे आयोजित ‘धूलिवंदन २०२६’मध्ये नागरिकांनी हिंदी-मराठी गाण्यांच्या तालावर ठेका धरला. गुलाल-द अल्टीमेट होळीमध्ये सेलिब्रिटी डीजे, ईडीएम म्युझिक आणि खाद्य महोत्सवामुळे तरुणाईचा उत्साह द्विगुणित झाला होता.
वाघबीळ येथील मंत्रा लॉन्स येथील ‘कलरलँड २०२६’मध्ये डान्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, तर लेक शोर मॉलमध्येही मनोरंजनाची मोठी रेलचेल होती.
यंदा ‘फेस पेंटिंग’ची विशेष क्रेझ
यावर्षीच्या धुळवडीत ‘फेस पेंटिंग’ ही कला आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. कचराळी आणि उपवन तलाव परिसरात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी आपल्या चेहऱ्यावर तिरंगा, वाघ, फुलपाखरे आणि विविध कलाकृती रेखाटून घेतल्या होत्या. या अनोख्या कलेमुळे उत्सवाच्या रंगात एक वेगळीच भर पडली.
पर्यावरणपूरक संदेश
बहुतांश आयोजकांनी रासायनिक रंगांऐवजी ‘ऑरगॅनिक’ गुलाल आणि नैसर्गिक रंगांच्या वापराला प्राधान्य देत सुरक्षित होळी साजरी करण्याचे आवाहन केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

