कामबंद आंदोलनाने भूमी अभिलेख सेवा ठप्प
शहापूर, ता. ३ (वार्ताहर) : भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत महसूलमंत्र्यांनी ठोस निर्णय न घेतल्याने १८ फेब्रुवारीपासून असहकार आंदोलन सुरू झाले. त्यानंतर आता भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाचे पडसाद शहापूर तालुक्यात उमटले असून, येथील जमीन मोजणी, दाखले, नकाशे, नोंदीची कामे ठप्प झाली आहेत. जमीन मोजणीची २० प्रकरणे पुढे ढकल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी जूनमध्ये संप पुकारला होता. आजपर्यंत केवळ बैठका आणि आश्वासने देऊन वेळ मारून नेली. प्रत्यक्षात कोणतीही ठोस निर्णय न घेतल्याने भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी १८ फेब्रुवारीपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने कृती समितीकडून भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवार (ता. २)पासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.
या आंदोलनाचे पडसाद शहापूर तालुक्यात उमटले असून, जमीन व्यवहार, शेतीसंबंधी कामे व विविध दाखल्यांसाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रमुख मागण्या
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये ‘मोजणी व्हर्जन २’ सॉफ्टवेअर अधिक सुटसुटीत व वापरण्यास सोपे करणे, नियुक्ती प्राधिकाऱ्यांची परवानगी व चौकशीशिवाय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची पद्धत तत्काळ बंद करणे, १४ जानेवारीला १८ मोजणी प्रकरणांबाबत काढलेले परिपत्रक रद्द करणे, प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतंत्र व पुरेसे मोजणी साहित्य (रोव्हर, लॅपटॉप, डाटा कार्ड) उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी अपवादात्मक परिस्थिती वगळता, कामकाज न करण्याबाबत स्पष्ट आदेश, अन्यायकारक प्रतिनियुक्ती थांबवणे, अतिरिक्त कामाचा नियमानुसार मोबदला देणे आणि वेतन वसुली आदेश तत्काळ रद्द करणे, या मागण्या लेखी मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

