सिडकोचा भूखंड हडप करण्यासाठी मृताला केले जिवंत

सिडकोचा भूखंड हडप करण्यासाठी मृताला केले जिवंत

Published on

नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : सिडकोच्या संपादित जमिनीच्या मोबदल्यात मिळणारा कोट्यवधींचा भूखंड हडपण्यासाठी नातेवाइकांनीच मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार उरणमध्ये समोर आला आहे. १२ वर्षांपूर्वी मृत झालेल्या आपल्या आत्याला जिवंत भासवून, तिच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एका बनावट महिलेला निबंधक कार्यालयात उभे करून तिच्या नावाने हक्कसोडपत्र तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. उरण पोलिसांनी या प्रकरणात चौघांविरोधात फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

चिर्ले येथील तक्रारदार सुभाष नामदेव घरत (वय ५६) यांची आई लहानुबाई उर्फ बानुबाई यांचे ३ मार्च २०१३ रोजी निधन झाले होते. सर्व नातेवाईक त्यांच्या अंत्यविधीला हजर होते, मात्र आजोबा रामा गमा मढवी यांच्या नावे चिर्ले येथे असलेल्या जमिनींवर डोळा ठेवून नातेवाइकांनीच कट रचला. ऑक्टोबर २०२४ मध्ये कृष्णा गजानन मढवी, मयूर तुकाराम मढवी आणि बाबू उर्फ बाबुराव रामा मढवी यांनी घरत यांच्या आईच्या केवळ नावातील साम्याचा फायदा घेत पनवेल तालुक्यातील डेरवली येथील एका महिलेला रजिस्टर ऑफिसमध्ये लहानुबाई म्हणून उभे केले.

या डमी महिलेचे फोटो, सही आणि अंगठा वापरून विनामोबदला हक्कसोडपत्र पदरात पाडून घेतले. विशेष म्हणजे या बनावट हक्कसोडपत्राच्या आधारे त्यांनी १८ मार्च २०२५ रोजी बांधकाम व्यावसायिक पार्थ गजोरा याच्या नावे जमिनीचे खरेदीखतही करून घेतले. मूळ वारसदार सुभाष घरत यांना व इतर वारसदारांना कोणतीही कल्पना न देता हा व्यवहार पूर्ण करण्यात आला. दरम्यानच्या काळात सुभाष घरत यांनी तलाठी कार्यालयात वारसदार असलेल्या आपल्या आईची माहिती घेतल्यानंतर तिच्या नावाने हक्कसोडपत्र घेण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर बनावट महिलेच्या माध्यमातून हा प्रकार केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कृष्णा, मयूर, बाबुराव मढवी आणि भूखंड खरेदी करणारा पार्थ गजोरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com