देवी-देवतांचे वाजतगाजत आगमन

देवी-देवतांचे वाजतगाजत आगमन

Published on

देवी-देवतांचे वाजतगाजत आगमन
मोखाड्यातील बोहाडा उत्सवाला सुरुवात, शेकडो वर्षांची परंपरा
भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. ४ ः पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात जगदंबा उत्सव (बोहाडा) उत्सवाला श्री गणेशाचे पूजन मिरवणुकीने सुरुवात झाली. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील आठ दिवस हा सोहळा रंगणार असून, देवी-देवतांचे संबळच्या तालावर वाजतगाजत आगमन झाले आहे.
आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेला मोखाड्याचा बोहाडा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आदिवासी समाजाच्या देवता, रामायण, महाभारत, रामविजय, विष्णुपुराण, पांडव प्रताप अशा धार्मिक ग्रंथातील देवतांचे उंबर, सागाच्या लाकडात कोरलेले, देवदेवतांचे मुखवटे आकर्षणाचे केंद्र असते. आधुनिक रंग, कलाकुसर करून आदिवासी कलाकारांनी साकारलेले मुखवटे रुढी, परंपरेने विशिष्ट घराण्यांमध्ये वाटप करण्यात येते. देवी-देवतांचे मुखवटे घालून, पौराणिक आयुधे तसेच पोशाख घालून वाजंत्री, संबळच्या तालावर लयबद्ध नृत्याचे सादरीकरण पाहण्यासाठी पंचकृषीतील भाविक मोखाड्यात येतात.
---------------------
पौराणिक घटनांना उजाळा
- उत्सवाला २५० हून अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. अनेक मुखवटे २०० वर्षांपासून आजही सोंगाच्या ताफ्यात आहेत. धूलिवंदनापासून सुरुवात झालेल्या उत्सवात सर्व जाती-धर्मातील नागरिक सहभागी होतात. गणरायाच्या मिरवणुकीने उत्सवाला प्रारंभ होतो.
- जगदंबा मंदिरासमोरील मंडपामध्ये गणरायाचे विधिवत पूजन करण्यात आले. द्वितीयेस मत्स्यावतार, तृतियेस कुर्मावतार, चतुर्थीला वराह अवतार, पंचमीस भीम-हिडींबा राक्षणीचा विवाह, भीम बकासुर युद्धाचा महाभारतातील प्रसंग, षष्ठीस लहान बोहाडा, सप्तमीला बोहाडा उत्सव होणार आहे.
ः- पहाटे दशानन रावणाची मिरवणूक काढण्यात येते. या सोंगाचे बोहाड्यात विशेष आकर्षण असते. रावणाची मिरवणूक बघण्यासाठी सर्वचजण आतुर असतात. त्यासाठी मोठी गर्दी होते. या मिरवणुकीसाठी संबळचे ताफे सज्ज असतात. डोळ्याचे पारणे फिटणारे नृत्य केले जाते.
-----------------
अष्टमीला जगदंबेची मिरवणूक
या सोहळ्यानिमित्त जगदंबेची भव्य महापूजा केली जाते. देवी-महिषासुर, शुंभ-निशुंभ यांच्या युद्धाचा थरारक प्रसंग साकारला जातो. त्यानंतर जगदंबेची विजयी मिरवणूक काढली जाते. प्रत्येक घरासमोर रांगोळी काढली जाते. देवीच्या मिरवणुकीत फुले, अक्षता, कुरमुरे, लाह्या उधळल्या जातात. त्यानंतर साई मंदिराजवळील मैदानात कुस्त्यांचा जंगी फड आकर्षणाचे केंद्र राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com