सेंद्रिय खतावर फुलवली ३ एकरावर कलिंगड शेती
सेंद्रिय खतावर फुलवली तीन एकरांवर कलिंगड शेती
केवळ ८० दिवसांत उत्पादनाला सुरुवात
वाणगाव, ता. ४ (बातमीदार) : धुंदलवाडी (ता. डहाणू) येथील नरेशवाडी फार्मवर सेंद्रिय शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधत कलिंगड पिकाचे चांगले उत्पादन घेण्यात आले आहे. हा प्रयोग पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.
श्री गिरी वनवासी प्रगती मंडळ यांच्या नरेशवाडी फार्मवर कृषी व्यवस्थापक ऋषिकेश खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरू येथील सुवर्णा हायब्रिड सीड कंपनी यांच्या ‘आयुष’ वाणाचे कलिंगड सुमारे तीन एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आले. १ डिसेंबरला बियाणे टोकन पद्धतीने पेरणी करून सुरुवातीपासूनच तांत्रिक व शास्त्रीय व्यवस्थापनावर भर देण्यात आला.
लागवडीसाठी मल्चिंग व ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करण्यात आला. सेंद्रिय खताचा शास्त्रीय वापर केल्याने मुळांची वाढ जोमदार झाली. पाण्याचे काटेकोर नियोजन व सेंद्रिय पद्धतीने कीड-रोग व्यवस्थापन केल्यामुळे पिकावर कोणताही ताण आला नाही आणि वाढ सातत्यपूर्ण राहिली. तांत्रिक व्यवस्थापनामुळे केवळ ८० दिवसांत काढणीयोग्य पीक तयार झाले. काढणीदरम्यान प्रति फळ चार ते आठ किलो वजनाची, आकर्षक आकाराची व दर्जेदार कलिंगडे मिळाली. या लागवडीतून प्रति एकर सुमारे २० टन उत्पादन घेण्यात यश आले.
सध्या बाजारात या कलिंगडाला २० ते २५ रुपये प्रति किलो दर मिळत असून, प्रति एकर सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत एकूण उत्पन्न मिळाले आहे. या पिकासाठी प्रति एकर अंदाजे ४५ हजार रुपये खर्च आला असून, त्यातून सुमारे एक लाख ५५ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाल्याची माहिती प्रक्षेत्र व्यवस्थापक ऋषिकेश खिलारी यांनी दिली.
------
या यशस्वी प्रयोगाची माहिती घेण्यासाठी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी नरेशवाडी फार्मला भेटी दिल्या असून, प्रत्यक्ष पाहणीद्वारे मार्गदर्शन घेतले आहे. कलिंगड किंवा तत्सम भाजीपाला पिकांची लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना श्री गिरी वनवासी प्रगती मंडळ व नरेशवाडी फार्ममार्फत तांत्रिक मार्गदर्शन, नियोजन व व्यवस्थापनासाठी मदत केली जाणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती पद्धती आणि शास्त्रीय व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास अल्प कालावधीतही भाजीपाला पिकांतून शाश्वत व भरघोस आर्थिक लाभ मिळू शकतो, हे नरेशवाडी फार्मवरील या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे.
------------
कोट
कलिंगड लागवडीत योग्य वाणाची निवड, बियाणे टोकन पद्धत, मल्चिंग व ठिबक सिंचन यामुळे पाण्याची बचत होऊन पिकाची वाढ समसमान होते. सेंद्रिय खताचे शास्त्रीय व्यवस्थापन व वेळेवर कीड-रोग नियंत्रण केल्यास केवळ ८० दिवसांत दर्जेदार उत्पादन मिळते. नरेशवाडी फार्मवर प्रति एकर २० टन उत्पादन घेऊन खर्च ४५ हजारांत मर्यादित ठेवता आला. इच्छुक शेतकऱ्यांनी तांत्रिक पद्धतीने लागवड केल्यास भाजीपाला पिकातून निश्चितच चांगला नफा मिळू शकतो.
- ऋषिकेश खिलारी, प्रक्षेत्र व्यवस्थापक, नरेशवाडी, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

