राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवात तरुणाईचा जल्लोष

राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवात तरुणाईचा जल्लोष

Published on

तरुणाईच्या कलागुणांचा सन्मान
राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवात नवकल्पनांना व्यासपीठ
सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ४ : राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सव २०२६ हा दोनदिवसीय महोत्सव नुकताच मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथे उत्साहात पार पडला. राष्ट्रीय कला मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी निधी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
दोन दिवसांच्या या महोत्सवात तरुण चित्रपट निर्मात्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विविध भाषांतील चित्रपटांचे प्रदर्शन, मार्गदर्शनपर सत्रे आणि विचारमंथनपर चर्चांमुळे हा दोन दिवसांचा सिनेमा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला. या महोत्सवाचे उद्‍घाटन चित्रपट दिग्दर्शक रवि उद्यावर, स्वागत समिती सचिव राज कांबळे, अभाविप राष्ट्रीय मंत्री पायल किनाके, राष्ट्रीय कला मंच संयोजक अभिनव दीप, एनएसएफएफ संयोजक सौम्या चौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. महोत्सवात ज्यूरी ब्रिफिंग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात ख्यातनाम लेखिका निधी सिंह धर्मा, प्रख्यात चित्रपट लेखक अमरनाथ झा, संगीत दिग्दर्शक राहुल सुहास, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा, राष्ट्रीय पुरस्कार विजेती दिग्दर्शिका वंदिता चक्रदेव तसेच चित्रपट दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या मान्यवरांनी माध्यमांची भूमिका, बदलते चित्रपटसृष्टीचे स्वरूप आणि समाजातील सिनेमाचे महत्त्व यावर सखोल विचार मांडले. त्यांनी तरुण चित्रपट निर्मात्यांना नावीन्यपूर्ण विचार, जबाबदार कथनशैली आणि सर्जनशील धैर्य जपण्याचे आवाहन करीत प्रेरित केले.
महोत्सवासाठी एकूण ३० चित्रपटांची निवड करण्यात आली होती आणि हे सर्व चित्रपट दोन दिवसांच्या महोत्सवात प्रदर्शित करण्यात आले. विविध विषय, शैली आणि भाषांतील या चित्रपटांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवादरम्यान चित्रपट क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांच्या चार मार्गदर्शनपर मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका विशेष पॅनेल चर्चेचे आयोजनदेखील करण्यात आले होते. या चर्चेत चित्रपट दिग्दर्शिका पूजा कदम आणि चित्रपट निर्माते अविनाश त्रिपाठी यांनी ‘एआय आणि भारतीय सिनेमाचे भविष्य’ या विषयावर आपले विचार मांडले.
समारोप सोहळ्यास क्रिएटिव्ह डायरेक्टर, बिर्ला स्टुडिओजचे महर्षी शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशीष चौहान, चित्रपट विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तरुण राठी, राष्ट्रीय कला मंचचे प्रमुख अंकित शुक्ला आणि मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विभागाचे संचालक सुनील पाटील यांचीही उपस्थिती लाभली होती.
------------
‘पानपंख’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘पानपंख’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. विशेष प्रशंसा पुरस्कार ‘सोंगटी’ आणि ‘सीझ’ या चित्रपटांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार ‘सांझा कुआं’ याला मिळाला. सर्वोत्कृष्ट संपादन पुरस्कार ‘रिहा’ या चित्रपटाला तर सर्वोत्कृष्ट युवा दिग्दर्शक पुरस्कार ‘बाप रे बाप’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकास मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com