हजेरी लावा आणि काम करा!
कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले!
कल्याण पंचायत समितीत बायोमेट्रिक सक्ती
टिटवाळा, ता. ५ (वार्ताहर) : शासकीय कार्यालयातील वेळेचे उल्लंघन, बायोमेट्रिक प्रणालीचा गैरवापर आणि कामकाजातील हलगर्जी याला चाप लावण्यासाठी कल्याण पंचायत समिती प्रशासनाने आता कठोर पवित्रा घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते विशाल कुरकुटे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने अधिकृत परिपत्रक काढून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केली आहे. कार्यालयीन शिस्तीचा बोजवारा उडाल्याच्या तक्रारींनंतर प्रशासनाने उगारलेल्या या दंडुक्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
नव्या आदेशानुसार, केवळ हजेरी लावून कार्यालयाबाहेर जाणे किंवा सहकाऱ्यांच्या मदतीने हजेरी नोंदवणे आता महागात पडणार आहे. वारंवार उशिरा येणाऱ्या किंवा कार्यालयीन वेळेत गायब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना वेळेत सेवा मिळावी आणि शासकीय कामात पारदर्शकता यावी, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. कार्यालयीन वेळेत बायोमेट्रिक उपस्थिती न नोंदवल्यास किंवा कामात कसूर आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यासह प्रशासकीय कारवाईचा सामना करावा लागणार आहे.
वरिष्ठांचे ‘वॉच’ आणि कठोर इशारा
वाहनचालक आणि शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांनी दिलेली कामे जबाबदारीने आणि वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे. कार्यालयीन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष निर्देश देण्यात आले आहेत. शासकीय साधनांचा गैरवापर थांबवून कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे पंचायत समितीच्या कामकाजात शिस्त आणि गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशी असेल कार्यालयीन वेळ
प्रशासनाने वर्गनिहाय उपस्थितीसाठी स्पष्ट वेळा निश्चित केल्या आहेत.
वर्ग-४ संवर्ग : सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:३०
वर्ग-३ संवर्ग : सकाळी ९:४५ ते सायंकाळी ५:४५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

