

दुर्गम भागात पाण्यासाठी वणवण
शहापुरात १५ कोटींचा पाणीटंचाई आराखडा कागदावरच; दोन गावे आणि आठ पाड्यांची तहान आता टँकरवर
भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ५ : तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले असून, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. तालुक्यातील दोन गावे आणि आठ पाड्यांमध्ये सद्यःस्थितीत १० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही शाश्वत उपाययोजना न झाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
तालुक्यातील कोथळे (लोकसंख्या ७५०) आणि उंबरखांड (लोकसंख्या ६५२) या दोन मुख्य गावांसह नारळवाडी, पारधवाडी, राईचीवाडी, नवीनवाडी, पाटोळपाडा, भोयेपाडा, सखारामपाडा आणि मुसळेपाडा या आदिवासीबहुल वस्त्यांमध्ये पाण्याचे सर्व नैसर्गिक स्रोत आटले आहेत. विहिरी आणि नाल्यांनी तळ गाठल्याने केवळ नागरिकच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या पशुधनासमोरही पिण्याच्या पाण्याचा गंभीर यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.
प्रशासकीय अनास्था
पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी २०२५ मध्ये १५ कोटी ४७ लाख ७० हजार रुपयांचा टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला होता. मात्र, इतका मोठा निधी उपलब्ध असूनही वर्षभरात एकही शाश्वत जलस्रोत किंवा ठोस योजना प्रत्यक्षात उभी राहू शकली नाही. टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत राबवायच्या अन्य उपाययोजना निव्वळ कागदावरच राहिल्याने, प्रशासनाकडे आता ‘टँकर’ हा एकमेव तात्पुरता पर्याय शिल्लक राहिला आहे.
परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे
मागील वर्षी शहापूर तालुक्यातील ४८ गावे आणि १५५ पाड्यांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसला होता. त्या वेळी जून अखेरपर्यंत तब्बल ४४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदाही परिस्थिती त्याच दिशेने जात असून, येत्या काही दिवसांत बाधित गावे आणि वाड्यांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाणीटंचाईचा सामना करणारी गावे आणि पाडे
गावे : कोथळे (७५० लोकसंख्या), उंबरखांड (६५२ लोकसंख्या).
पाडे/वस्त्या : नारळवाडी, पारधवाडी, राईचीवाडी, नवीनवाडी, पाटोळपाडा, भोयेपाडा, सखारामपाडा आणि मुसळेपाडा.
ठळक मुद्दे :
नैसर्गिक स्रोत : विहिरी आणि नाले कोरडेठाक.
टंचाईचा काळ : जानेवारी अखेरपासूनच टंचाईची तीव्रता वाढली.
पशुधन धोक्यात : पिण्याच्या पाण्याअभावी जनावरांचे हाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.