होळी करा लहान पोळी करा दान
होळी करा लहान, पोळी करा दान!
कल्याणमध्ये ‘अंनिस’चा मानवतावादी उपक्रम
कल्याण, ता. ५ (वार्ताहर) : होळीच्या अग्नीत अन्नाची नासाडी करण्यापेक्षा ते अन्न गरजूंना मिळावे, या उदात्त हेतूने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (कल्याण शाखा) व स्थानिक सोसायट्यांच्या वतीने ‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम राबविण्यात आला. कल्याणमधील विविध सोसायट्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली.
होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य अग्नीला अर्पण करून जाळण्याची प्रथा आहे. मात्र, नैवेद्याच्या या पोळ्या बनवण्यामागे कष्टकरी शेतकऱ्यांचे अतोनात कष्ट असतात. हे कष्ट आगीत न टाकता त्या अन्नाचा विनियोग गरजूंसाठी व्हावा, या उद्देशाने या पोळ्यांचे संकलन करण्यात आले. फोर्टिस हॉस्पिटलजवळील झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना या पुरणपोळ्यांचे वाटप करून त्यांचा सण गोड करण्यात आला.
उपक्रमातून समितीने केवळ अन्नाचे दानच केले नाही, तर समाजाला लाकडांचा कमीत कमी वापर करून वृक्षतोड थांबवा, रंगांच्या उत्सवात पाण्याचा अपव्यय टाळा, रासायनिक रंगांऐवजी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करा, असे महत्त्वाचे संदेशही दिले. या वेळी अंनिसच्या ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुषमा बसवंत, जिल्हा प्रधान सचिव राजेश देवरुखकर, सोशल मीडिया प्रमुख नितीन वानखेडे, प्रज्ञा चव्हाण, संजय त्रिभुवन, ॲड. विनोद जगताप, संतोष म्हात्रे आणि विविध सोसायट्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहभागी सोसायट्या
कल्याण पूर्व भागातील राकेश अपार्टमेंट, विघ्नहर्ता कॉलनी, शिवसमर्थ कॉलनी, आई गावदेवी कॉलनी, ज्योतिर्लिंग सोसायटी, गुरुदत्त अपार्टमेंट, कल्पतरू कॉलनी, नूतन ज्ञान मंदिर शाळा परिसर, शिवाजी महाराजनगर वालधुनी तसेच कल्याण पश्चिम येथील रामबाग लेन नंबर ६ या सोसायट्यांनी या मोहिमेत हिरिरीने सहभाग घेतला.

