कोपरखैरणे परिसरात सर्वाधिक भंगार वाहने
तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : शहर स्वच्छ आणि सुबक ठेवण्यासाठी नवी मुंबई महापालिकाच्या अतिक्रमण विभागाने कंबर कसली आहे. भंगार अवस्थेत रस्त्यांवर टाकून दिलेल्या वाहनांविरोधात व्यापक मोहीम राबवली आहे. गेल्या वर्षभरात पालिकेच्या आठही विभाग कार्यक्षेत्रात एक हजारहून अधिक भंगार वाहनांवर कारवाई करण्यात आली. २०२६ च्या पहिल्याच महिन्यात ५३ वाहने उचलून क्षेपणभूमीत जमा करण्यात आली आहेत. तसेच सर्वाधिक भंगार वाहने ही कोपरखैरणे परिसरात आढळून आली आहेत.
शहरातील विविध नोड्समध्ये अनेक वाहने महिनोन्महिने रस्त्याच्या कडेला भंगार अवस्थेत उभी राहत होती. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना नियमित साफसफाई करताना अडचणी येत होत्या. वाहनांच्या खाली कचरा साचून अस्वच्छता वाढत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागाने विशेष मोहीम हाती घेत कारवाईचा सपाटा लावला. आयुक्त डॉ. कैलास शिंदे व अतिरिक्त आयुक्त डॉ. कैलास देठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असून, सरकारी, निमसरकारी संस्था व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविल्यास शहराला राष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, केवळ वाहने उचलण्यापूरतीच कारवाई न करता संबंधित वाहनमालकांवर दंडात्मक कारवाई केल्यास पालिकेच्या तिजोरीत भर पडेल आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.
वाहनमालकांना २४ तासांची नोटीस
कारवाईपूर्वी संबंधित वाहनांचे सर्वेक्षण करून वाहनांवर २४ तासांची नोटीस चिकटविण्यात आली. नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनमालकांची वाहने टोइंगद्वारे उचलून पालिकेच्या क्षेपणभूमीत जमा करण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते मोकळे झाले असून, स्वच्छता मोहिमेला गती मिळाली आहे.
जानेवारी ते डिसेंबरदरम्यान विभागनिहाय कारवाई
बेलापूर ५७
नेरूळ ११८
वाशी ९९
तुर्भे १३५
कोपरखैरणे ४३०
घणसोली १६६
ऐरोली १२
दिघा ०२

