शिक्षक-शिक्षकेतरांच्या मागण्यांसाठी सरकारकडे धाव
टोकावडे, ता. ५ (बातमीदार) : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तातडीच्या बैठकीची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी मंत्रालयात निवेदन सादर करून शिक्षण विभागाशी संबंधित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याची विनंती केली आहे.
काही वर्षांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात विशेष बैठक बोलवावी, अशी मागणी आमदार म्हात्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या बैठकीला शिक्षणमंत्री, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, सर्व शिक्षक आमदार उपस्थित राहावेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.
महापालिका क्षेत्रातील खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षकांना १०० टक्के वैद्यकीय प्रतिपूर्ती देण्यात यावी आणि मुंबई महापालिकेच्या इमारती भाडेतत्त्वावर देताना भाडेवाढ दहा टक्क्यांपेक्षा जास्त न करण्याबाबतचा निर्णय कायम ठेवावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सरकारने या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर बैठक घ्यावी, अशी अपेक्षा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.
निवेदनाद्वारे मागण्या
निवेदनात शिक्षक-शिक्षकेतरांच्या अनेक महत्त्वांच्या मागण्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना समितीच्या अहवालानुसार जुनी पेन्शन योजना लागू करणे, मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना डीसीपीएस योजना लागू करणे, तसेच नवी मुंबई महापालिकेतील ठोक मानधन तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षण सेवकांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेणे या मागण्यांचा समावेश आहे.
वेतन, भत्त्याचा प्रश्न
याशिवाय ठाणे, वसई-विरार, खोपोली, कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ परिसरातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांशी संबंधित प्रश्नही तातडीने निकाली काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

