रस्त्याच्या काँक्रिटिकरणामुळे मालाडमध्ये नागरिक त्रस्त

रस्त्याच्या काँक्रिटिकरणामुळे मालाडमध्ये नागरिक त्रस्त

Published on

रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे मालाडमध्ये नागरिक त्रस्त
पर्यायी कारगिल रस्त्याची दुरवस्था; खड्डे व चिखलामुळे वाहतूक कोंडी
मालाड, ता. ५ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील आंबोजवाडी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या १५ दिवसांपासून मुख्य प्रवेशद्वारापासून बाजारापर्यंत सुरू असलेले काम संथ गतीने सुरू असल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत.
आंबोजवाडी परिसरातून बाहेर पडण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने काँक्रीटीकरणाच्या कामासाठी तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आंबेडकर चौक, पारधीवाडा तसेच आसपासच्या भागातील नागरिकांना मोनिया मशीद ते कारगिल नगर मार्गे पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. मात्र, हा कारगिल मार्ग कच्चा असून, चिखलाने भरलेला आहे. तसेच जागोजागी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यापूर्वीच रस्त्याची ही दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यावरून रुग्णवाहिका येण्यासही अडचण निर्माण होत असून, आपत्कालीन परिस्थितीत गंभीर समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पालिका प्रशासनाने काँक्रीटीकरणाचे काम तातडीने पूर्ण करून मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा. तसेच पर्यायी कारगिल रस्ता तातडीने समतोल करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
“दुचाकीवरून मुलींना शाळेत ने-आण करताना खड्डेमय रस्त्यामुळे कंबरदुखीचा त्रास वाढला आहे. जवळपास एक किलोमीटर वळसा घालून जावे लागत असल्याने इंधन खर्चही वाढला आहे.” अशी प्रतिक्रिया स्‍थानिक रहिवासी सोमा बाबू डे यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com