पोलिसांचा शाळा प्रशासनाला सज्जड दम
बदलापूर पोलिसांचा शाळांना सज्जड दम
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत हलगर्जी केल्यास थेट गुन्हे
बदलापूर, ता. ५ (बातमीदार) : बदलापूर परिसरात शालेय मुलींवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत बदलापूर पोलिसांनी शहरातील शाळा व्यवस्थापनासाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांत बदलापूर परिसरात अल्पवयीन मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे समोर आले आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत १२ वर्षीय शालेय मुलीचा स्कूल बसचालकाने विनयभंग केल्याचे उघडकीस आले होते. हे प्रकरण राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही चर्चेचा विषय ठरले होते. यापूर्वी २०२४ मध्ये एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतरही अशा प्रकारच्या घटना थांबलेल्या नसून अलीकडेच चारवर्षीय मुलीवर स्कूल व्हॅनचालकाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पोलिस आयुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांच्या उपस्थितीत बदलापूर पश्चिम येथील बाळासाहेब म्हात्रे महाविद्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शहरातील सुमारे १२० शाळांचे मुख्याध्यापक आणि प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि उपनगराध्यक्षा प्रियंका दामले उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. नियमांचे पालन न केल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही देण्यात आला.
स्कूलबससाठी नवी नियमावली
प्रणाली सक्तीची : प्रत्येक शालेय वाहनात (बस/व्हॅन) सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस प्रणाली असणे अनिवार्य आहे.
मदतनीस बंधनकारक : वाहनामध्ये चालकासोबत महिला आणि पुरुष असे दोन्ही मदतनीस असणे आवश्यक आहे.
चारित्र्य पडताळणी : शाळांनी वाहनचालक आणि मालकांचे ‘पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र’ तपासणे सक्तीचे आहे.
क्षमता मर्यादा : वाहनात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक केल्यास आरटीओमार्फत कठोर कारवाई केली जाणार आहे.
पालक समिती : शाळांनी दरमहा पालक समितीची बैठक घेऊन सुरक्षा उपायांचा आढावा घेणे गरजेचे आहे.

