अनधिकृत मोबाईल टॉवरविरोधात उपोषण
अनधिकृत मोबाईल टॉवरविरोधात बेमुदत उपोषण
नेतिवली टेकडी परिसरातील नागरिक आक्रमक
कल्याण, ता. ५ (बातमीदार) : नेतिवली टेकडी परिसरातील कथित अनधिकृत मोबाईल टॉवरच्या मुद्द्यावरून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात सामाजिक कार्यकर्ते हरीश अंकुश इंगळे यांनी गुरुवार (ता. ५) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नेतिवली टेकडी परिसरातील साईकृपा हॉटेलच्या मागील बाजूस तसेच होमबाबानगर परिसरात दोन मोठे मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या टॉवर्ससाठी नगररचना विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच संबंधित जागेच्या ७/१२ उताऱ्यावरही टॉवर उभारणीची कोणतीही नोंद नसल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय संबंधित कंपनीकडे आवश्यक असलेला ना हरकत दाखलाही उपलब्ध नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नियम धाब्यावर बसवून उभारण्यात आलेल्या या टॉवर्समुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः घनदाट वस्तीच्या भागात अशा प्रकारे टॉवर उभारल्यामुळे संभाव्य दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. यासंदर्भात स्थानिकांनी महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असल्याचे सांगितले. मात्र कागदोपत्री तक्रारी होऊनही प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. प्रशासन कोणाच्या दबावाखाली या बेकायदा प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सुरुवातीपासूनच विरोध
दरम्यान, उपोषणकर्ते हरीश अंकुश इंगळे यांनी सांगितले, की लोकांच्या आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी खेळणाऱ्या या अनधिकृत टॉवर्सना आमचा सुरुवातीपासून विरोध आहे. जोपर्यंत हे टॉवर्स हटवले जात नाहीत तोपर्यंत मी माझे उपोषण मागे घेणार नाही. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का आणि संबंधित अनधिकृत टॉवर्सवर कारवाई होणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

