ठाण्यातील ११ आयव्हीएफ, सोनोग्राफी सेंटर झाडाझडती
ठाण्यातील ११ आयव्हीएफ,
सोनोग्राफी सेंटरची झाडाझडती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : बदलापूर येथील स्त्रीबीज विक्री प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिका क्षेत्रातील ११ आयव्हीएफ तसेच २५९ सोनोग्राफी केंद्रांवर सुरू असलेल्या कामकाजाची व अवैध केंद्राचा शोध घेण्यासाठीची तपासणी मोहीम पालिकेकडून नुकतीच हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत सहा आयव्हीएफ केंद्रांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
बदलापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गरजू महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून स्त्रीबीज विकसित करून घेतले जात असल्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान नाशिकमध्ये परवानगी असलेल्या एका आयव्हीएफ केंद्राचे ठाण्यात बेकायदा संचालन सुरू असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित केंद्राने ठाणे महापालिकेकडे कोणतीही नोंदणी न करता गुप्त पद्धतीने सेवा सुरू ठेवली. ही बाब समोर आल्यानंतर बदलापूर पोलिस आणि ठाणे महापालिका आरोग्य विभागाकडून केंद्रावर कारवाई करण्यात आली होती. या घटनेनंतर शहरात बेकायदा व्यवहार सुरू नसल्याची खात्री करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. तपासणीदरम्यान आयव्हीएफ केंद्रांमध्ये उपचार घेणाऱ्या महिलांना प्रत्यक्षात स्त्रीबीजांची आवश्यकता होती का, यासंबंधीचे वैद्यकीय अहवाल उपलब्ध आहेत का, याबाबतची पडताळणी केली जात आहे. तसेच स्त्रीबीज कोणत्या अधिकृत बँकेतून उपलब्ध करून देण्यात आले, त्या बँकेत स्त्रीबीज देणाऱ्या महिलांची संमती होती का, याबाबतही माहिती घेतली जात आहे.
नियमानुसार एका महिलेला स्त्रीबीज एकदाच देण्याची परवानगी असताना काही महिलांकडून वारंवार स्त्रीबीज घेण्यात आले आहे का, याचाही तपास केला जात आहे. यासोबतच शहरातील सोनोग्राफी केंद्रांमध्येही आवश्यक परवानग्या आणि नोंदी योग्य पद्धतीने ठेवण्यात आल्या आहेत का, याची तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या या मोहिमेद्वारे शहरात बेकायदा पद्धतीने सुरू असलेली वैद्यकीय केंद्रे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
........
ठाण्याच्या गावदेवी भागात बेकायदा सुरू असलेल्या मालती आयव्हीएफ केंद्रावर यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे. शहरातील नोंदणीकृत ११ आयव्हीएफ केंद्रे आणि २५९ सोनोग्राफी केंद्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीसाठी सहा पथके नियुक्त करण्यात आली असून, अवैध केंद्रांचा शोध घेण्यासाठीही विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत सहा केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे.
- डॉ. प्रसाद पाटील, मुख्य आरोग्य अधिकारी, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

