व्हीआरएसवर लोको पायलटांची अंशतः माघार
व्हीआरएसवरून लोको पायलटांची अंशतः माघार
स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज रद्द करण्याची मागणी; ७२ पैकी ३०-३५ जणांची माघार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : वाढत्या कामाच्या ताणाविरोधात सामूहिक स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतलेल्या मध्य रेल्वेतील लोको पायलटांच्या भूमिकेत आता अंशतः बदल झाला आहे. स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जांबाबत पुनर्विचार करीत ७२ पैकी ३० ते ३५ लोको पायलटांनी आपल्या निर्णयातून माघार घेतली आहे.
दरम्यान, लोको पायलटांच्या प्रतिनिधींनी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे रेल्वे व्यवस्थापक यांना निवेदन देत स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेत कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. अलीकडेच वाढत्या कामाच्या ताणामुळे आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मोठ्या संख्येने लोको पायलटांनी स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज सादर केले होते. या निर्णयामुळे रेल्वे प्रशासनासमोर मनुष्यबळाचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र सहकाऱ्यांमधील चर्चा, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेला संवाद आणि परिस्थितीचा पुनर्विचार यानंतर काही लोको पायलटांनी माघार घेतल्याचे समोर आले आहे.
समस्यांवर तोडगा काढण्याची अपेक्षा
लोको पायलटांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात कामाच्या तासांचे नियोजन, पुरेशी विश्रांती, रनिंग रूममधील सुविधा तसेच प्रशासकीय दबाव कमी करण्याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मुद्द्यांवर प्रशासनाने सकारात्मक पावले उचलल्यास उर्वरित लोको पायलटही स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार करू शकतात, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
प्रशासनाची भूमिका महत्त्वाची
मोठ्या संख्येने लोको पायलटांनी माघार घेतली असली तरी उर्वरित अर्जांचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे या प्रकरणात मध्य रेल्वे प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे रेल्वे वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

