‘फुकट्या’ प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका

‘फुकट्या’ प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका

Published on

‘फुकट्या’ प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका
११ महिन्यांत १६.१६ लाख प्रवाशांवर कारवाई; ७१.३१ कोटींची दंडवसुली
एसी लोकलमधूनच ३.५१ कोटींची वसुली; तपासण्या अधिक कडक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईतील लोकल ही शहराची खरी लाइफलाइन मानली जाते. दररोज ७० लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. त्यापैकी मध्य रेल्वेचा वाटा साधारणतः ४० ते ३५ लाखांचा आहे. या प्रचंड गर्दीत अनेक जण विनातिकीट किंवा चुकीच्या श्रेणीत प्रवास करतात आणि त्याचा त्रास वैध तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागतो. हे वास्तव लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एप्रिल २०२५ पासून विशेष तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली. या मोहिमेमुळे ११ महिन्यांत १६ लाखांहून अधिक ‘फुकट्या’ प्रवाशांवर कारवाई करत ७१ कोटी ३१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सकाळी आणि संध्याकाळी पिकअवर्समध्ये लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. या वेळी अनेकजण पास किंवा तिकीट न घेता प्रवास करत असल्याचे प्रकार वारंवार समोर येतात. अशा प्रवाशांवर लगाम ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय गाड्या, एसी लोकल, नॉन-एसी लोकल, मेल एक्स्प्रेस तसेच प्रमुख स्थानकांवर सलग विशेष तपासण्या राबवल्या. आर्थिक वर्ष २०२५-२६ (एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६) या कालावधीत तिकीट तपासणी पथकांनी उपनगरी, मेल-एक्स्प्रेस तसेच वातानुकूलित लोकल गाड्यांमध्ये अनियमित प्रवासाची १६.१६ लाख प्रकरणे उघडकीस आणली. या प्रवाशांकडून ७१.३१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १५.९० लाख प्रकरणे आढळली होती आणि ६८.५६ कोटी रुपयांची वसुली झाली होती. यंदा प्रकरणांमध्ये सुमारे दोन टक्के वाढ, तर दंडाच्या वसुलीत चार टक्के वाढ झाली आहे. प्रवाशांमधील विनातिकीट प्रवास, चुकीच्या वर्गात प्रवास, भाडेफरक तसेच बुकिंग नसलेल्या सामानाशी संबंधित प्रकरणांवर विशेष तपासण्या राबविण्यात येत आहेत.

कोणत्या श्रेणीत किती दंड?

(एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६)

लोकल गाड्या

एसी लोकल - १.१० लाख प्रकरणे - ३.५१ कोटी

प्रथम श्रेणी - १.४६ लाख प्रकरणे - ४.६६ कोटी

द्वितीय श्रेणी - ११.६८ लाख प्रकरणे - ५८.६० कोटी
---------------

मेल/एक्स्प्रेस गाड्या

भाडेफरक (डिफरन्स ऑफ फेअर) - ५०,८०९ प्रकरणे - २.९८ कोटी

बुकिंग नसलेले सामान - १.४० लाख प्रकरणे - १.५६ कोटी
----------------------

फेब्रुवारीमध्ये ८.५८ कोटींची वसुली
फेब्रुवारी २०२६ महिन्यात तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान १.६५ लाख अनियमित प्रवासाची प्रकरणे आढळली. या कारवाईतून ८.५८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या महिन्यात एसी लोकलमध्ये १२ हजार २३५ प्रकरणांतून ३८.५६ लाख, प्रथम श्रेणीत १२,६५१ प्रकरणांतून ४०.१३ लाख, तर द्वितीय श्रेणीत १.१३ लाख प्रकरणांतून ६.६८ कोटी रुपये वसूल करण्यात आले. तर मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील भाडेफरकाच्या १६,३५९ प्रकरणांतून ९९.१३ लाख, तर बुकिंग नसलेल्या सामानाच्या १०,५७९ प्रकरणांतून १२.८३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
------------

एसी लोकलमध्ये दररोज ४०१ फुकटे
मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवांमध्ये सध्या ९४ एसी लोकल फेऱ्या चालवल्या जात आहेत. त्यापैकी १४ सेवा हार्बर मार्गावर नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत. एसी लोकलमध्ये विशेष तपासणी मोहिमेमुळे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १.१० लाख प्रकरणे आढळली आणि ३.५१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. यामध्ये दररोज सरासरी ४०१ प्रकरणे आढळून येतात आणि सुमारे १.२७ लाख दंड वसूल केला जातो. गेल्या वर्षीच्या ८९,७९९ प्रकरणे आणि २.९६ कोटी रुपये वसुलीच्या तुलनेत यंदा प्रकरणांमध्ये २३ टक्के, तर दंडात १८ टक्के वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com