टाटा रुग्णालयाचे स्क्रीनिंग मॉडेल, जास्त धोका असलेल्यांची वेळेत स्क्रीनिंग शक्य
ॲपवरून कळणार कर्करोगाचा धोका
टाटा रुग्णालयाचे स्क्रीनिंग मॉडेल; वेळेत तपासणी शक्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : कर्करोगाची वाढती रुग्णसंख्या आणि मर्यादित वैद्यकीय संसाधनांच्या पार्श्वभूमीवर, कर्करोगाचा धोका आधीच ओळखण्यासाठी टाटा रुग्णालयातील संशोधकांनी एक नवे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या मदतीने एखाद्या व्यक्तीला कर्करोगाचा धोका सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त आहे, याची माहिती मिळणार आहे. विशेषतः स्तनाच्या कर्करोगाच्या जोखमीचे मूल्यांकन करून अधिक धोका असलेल्या महिलांची वेळेत तपासणी करता येणे शक्य होणार आहे.
भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या आणि मर्यादित आरोग्य संसाधनांच्या देशात सर्व लोकांची कर्करोग तपासणी करणे व्यवहार्य नाही. त्यामुळे कर्करोगाचा धोका अधिक असलेल्या लोकांचे वेळीच निदान करणे, हा अधिक प्रभावी मार्ग ठरू शकतो. त्यामुळे या ॲपच्या माध्यमातून विविध जोखीम घटकांच्या आधारे एखाद्या व्यक्तीला कर्करोग होण्याची शक्यता मोजण्यासाठी सांख्यिकीय मॉडेलचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती टाटा रुग्णालयातील सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजीचे संचालक डॉ. राजेश दीक्षित यांनी दिली. हे ॲप पूर्णपणे विनामूल्य असेल. वापरकर्त्यांनी भरलेली वैयक्तिक माहिती कोणत्याही सर्व्हरवर संग्रहित केली जाणार नाही; ती केवळ वापरकर्त्याच्या मोबाईल फोनवरच राहील. हे ॲप या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत लॉन्च होणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.
---
मूलभूत माहितीवर अंदाज
ॲपमध्ये वापरकर्त्याचे वय, बॉडी मास इंडेक्स, मुलांची संख्या, रजोनिवृत्तीची स्थिती, कंबर-नितंब प्रमाण तसेच जीवनशैलीशी संबंधित काही माहिती भरावी लागेल. या माहितीच्या आधारे, सरासरी लोकसंख्येच्या तुलनेत संबंधित व्यक्तीला कर्करोगाचा धोका किती अधिक किंवा कमी आहे, हे ॲपच्या माध्यमातून दाखवले जाईल.
---
आनुवंशिक चाचणीची जोड
भविष्यात या ॲपमध्ये आनुवंशिक जोखीम तपासणीची माहितीही समाविष्ट करण्याचा विचार आहे. त्यासाठी व्यक्तींना रक्ततपासणी करावी लागेल. आनुवंशिक जोखीम अधिक आढळल्यास, हे मॉडेल अधिक अचूकपणे कर्करोगाचा धोका सांगू शकणार आहे.
---
सरकारी यंत्रणेलाही उपयोग
ॲपच्या माध्यमातून ठरावीक प्रदेशातील लोकसंख्येचा सरासरी डेटा उपलब्ध असल्यास, मर्यादित संसाधनांमध्ये कोणत्या गटाची प्रथम तपासणी करावी, हे ठरवण्यासाठी केंद्र वा राज्य सरकारलाही या माहितीचा उपयोग करता येईल, असेही डॉ. दीक्षित म्हणाले.
---
तीन प्रकारच्या कर्करोगांसाठी वापर
स्तनाचा कर्करोग
तोंडाचा कर्करोग
पित्ताशयाचा कर्करोग
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

