जिल्हा रुग्णालयांतही थ्रोम्बोलायसिस सेवा वाढवण्याची गरज,
एआयच्या मदतीने पक्षाघातावर जलद उपचार!
महाराष्ट्र पक्षाघात परिषदेत वैद्यकीय तज्ज्ञांचा सूर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : पक्षाघातासारख्या वेळेवर उपचार आवश्यक असलेल्या आजारांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, टेलिमेडिसिन आणि मानक उपचार मार्गदर्शक तत्त्वांचा वापर केल्यास रुग्णांना अधिक जलद आणि प्रभावी उपचार मिळू शकतात, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले. आरोग्य योजनांमध्ये गुणवत्तेचे निकष आणि उपचारांचे परिणाम यांना जोडून भविष्यातील परतफेडीच्या संरचनेत सुधारणा करण्यावरही भर देण्यात आला. महाराष्ट्र पक्षाघात परिषदेत शुक्रवारी तज्ज्ञांनी भविष्यातील उपचारपद्धती आणि उपाययोजनांबाबत चर्चा केली.
कोणत्याही आरोग्य योजनेत गुणवत्ता टिकवणे, ही सर्व संबंधित घटकांची जबाबदारी आहे. रुग्णालये, आरोग्य कर्मचारी आणि इतर भागीदारांनी उपचारांची गुणवत्ता सातत्याने तपासली पाहिजे. त्यासाठी विविध वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्पष्ट आणि मानक उपचार मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
हृदयविकाराचा झटका आल्यास तातडीने ‘थ्रोम्बोलायसिस’ तातडीने दिल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात. सध्या अनेक रुग्णवाहिकांमध्येही ‘थ्रोम्बोलायसिस’ देण्याची व्यवस्था आहे. त्याच धर्तीवर पक्षाघाताच्या उपचारांसाठीही तातडीने ‘थ्रोम्बोलायसिस’ आणि आवश्यकतेनुसार ‘मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी’ उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे जे.जे. रुग्णालयाचे रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अविनाश गुटे यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागात पक्षाघाताचे रुग्ण वेळेवर उपचार मिळण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे ‘गोल्डन अवर’मध्ये योग्य निदान आणि उपचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर आणि सीटीस्कॅनच्या मदतीने स्ट्रोकचे लवकर निदान करता येईल, असे न्यूरोलॉजिस्ट डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले.
राज्यभरातून अनेक रुग्ण उपचारासाठी मुंबईत येतात; मात्र संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांच्या गर्दीत पक्षाघाताचे निदान अनेकदा उशिरा होते. अशावेळी एआयआधारित प्रणालीने वेळीच सूचना दिल्यास रुग्णांना वेळेत उपचार देणे शक्य होईल, असे मज्जासंस्था रक्तवाहिनी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. रश्मी सराफ यांनी स्पष्ट केले.
---
जिल्ह्यातच उपचार मिळावेत!
जिल्हा रुग्णालयांमध्येही पक्षाघातावरील उपचारांची सुविधा वाढवण्याची आवश्यकता आहे. टेलिमेडिसिनद्वारे प्राथमिक स्तरावरच ‘आयव्हीटीपी ए’ थ्रोम्बोलायसिस देणे शक्य आहे; मात्र त्यासाठी प्रत्येक केंद्रावर आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करणे आणि त्यांना उच्चस्तरीय रुग्णालयांमध्ये प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. केवळ सुविधा जाहीर करून नव्हे, तर प्रत्येक केंद्रात जबाबदारी निश्चित केली पाहिजे. पक्षाघातावरील उपचारसाखळी जिल्हा स्तरापर्यंत मजबूत केल्यास ग्रामीण भागातील रुग्णांनाही वेळेत उपचार मिळतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

