दिव्यांगांची महापालिकेवर धडक
दिव्यांगांची महापालिकेवर धडक
प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांची घोषणाबाजी
उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. ६) दिव्यांगबांधवांनी महापालिका भवनावर धडक देत आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांना महापालिकेच्या इमारतीत प्रवेश नाकारण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि प्रवेशद्वारावर घोषणाबाजीसह गोंधळाची स्थिती निर्माण झाली. दिव्यांगांच्या काठी खरेदी प्रकरणातील कथित भ्रष्टाचार, मानधनाची मागणी आणि रोजगाराच्या प्रश्नांवर प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, यासाठी आंदोलनकर्ते आयुक्तांची भेट घेण्यासाठी महापालिकेत जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना प्रवेशद्वारावरच थांबविण्यात आले, त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत आयुक्त मनीषा आव्हाळे या सध्या मुंबई येथे अधिवेशनासाठी गेल्यामुळे त्या उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यानंतरही आंदोलकांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेत आंदोलन सुरूच ठेवले. या वेळी दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या काठी खरेदी प्रकरणात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे महापालिकेने यापूर्वी मान्य केल्याचा दावा करत संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई करता येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा
शहरातील दिव्यांगांना दरमहा ४,५०० रुपयांचे मानधन द्यावे, कंत्राटी कर्मचारी म्हणून रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि व्यवसायासाठी स्टॉल उपलब्ध करून द्यावेत, अशा प्रमुख मागण्याही आंदोलकांनी या वेळी मांडल्या. प्रशासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

