मेंदूतील रक्तगुठळी विरघळवण्याची व काढण्याची उपचारसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प

मेंदूतील रक्तगुठळी विरघळवण्याची व काढण्याची उपचारसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प

Published on

स्ट्रोकवरील उपचारासाठी रोडमॅप
उपचारसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः मेंदूघात (स्ट्रोक) हा भारतासमोरील एक अत्यंत गंभीर सार्वजनिक आरोग्य प्रश्न असून त्यावर तातडीने व प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे माजी कृषिमंत्री तथा राज्यसभा सदस्य, भारतीय वैद्यकीय संसदीय मंचाचे अध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केले. शुक्रवारी (ता. ६) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘महाराष्ट्र स्ट्रोक परिषद २०२६’चा उद्घाटन सोहळा झाला. या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. नीरज जैन यांनी भारतातील मेंदूघात व्यवस्थापनातील वैद्यकीय पुरावे व संशोधन अभ्यास या विषयावर सादरीकरण केले. भारतातील मेंदूघात उपचाराचे वैज्ञानिक पुरावे व संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष त्यांनी मांडले. तर मध्यवर्ती मज्जासंस्था रक्तवाहिनी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. रश्मी सराफ यांनी ‘शासकीय रुग्णालयातील रक्तवाहिनी मेंदूघात उपचार सद्यःस्थिती आणि पुढील मार्ग’ या विषयावर सादरीकरण केले. शासकीय रुग्णालयात या उपचाराची सद्यःस्थिती व भविष्यातील दिशा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी मेंदूघात उपचारात रक्तगुठळी विरघळवणे व यांत्रिक पद्धतीने रक्तगुठळी काढणे, यांसारख्या आधुनिक पद्धती उपलब्ध असल्या तरी जनजागृतीचा अभाव, पायाभूत सुविधांची कमतरता आणि प्रशिक्षित तज्ज्ञांची उणीव या तीन प्रमुख अडचणी अजूनही कायम असल्याचे सांगितले. आयुष्मान भारत व महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनांतर्गत मेंदूघात उपचाराचा समावेश हे सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासन मेंदूघात उपचाराबाबत अत्यंत गांभीर्याने विचार करत असून राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात मेंदूघात सेवा केंद्र उभारण्याचा शासनाचा मानस आहे. महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत यांत्रिक रक्तगुठळी निष्कासन उपचाराचा समावेश करण्यात आला असून गरीब व सर्वसामान्य रुग्णांनाही आता हे अत्याधुनिक उपचार मिळू शकतील. ग्रामीण भागात मेंदूघाताचे वेळेत निदान व्हावे, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे नियोजन सुरू आहे, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. डॉ. नितीन डांगे, डॉ. रश्मी सराफ, डॉ. अविनाश गुट्टे, डॉ. बटुक दियोरा, अनुमेहा श्रीवास्तव यांचा सत्रात सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com