अर्थसंकल्पात ''मुख्यमंत्री विज्ञान वारी''च्या उपक्रमाची घोषणा
‘मुख्यमंत्री विज्ञान वारी’ उपक्रमाची घोषणा
शालेयसाठी एक लाख सात हजार ७०३ कोटी ४१ लाखांची तरतूद
मुंबई, ता. ६ ः राज्याच्या शालेय शिक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात एक लाख सात हजार ७०३ कोटी ४१ लाखांची अशी भरीव तरतूद केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मात्र, मागील वर्षी करण्यात आलेल्या तरतुदींपैकी सात हजार ५५४ कोटी रुपये अखर्चित राहिले आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी या अर्थसंकल्पात १५ हजार ६७४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ती एक हजार ७३४ कोटी ४८ लाख रुपयांनी कमी असल्याने या विभागाच्या तुरतुदींना कात्री लागल्याचेही दिसून आले आहे.
या अर्थसंकल्पात शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विविध प्रकारचे प्रोत्साहन दिले जाते. आज राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘मुख्यमंत्री विज्ञान वारी’ या नव्या आणि महत्त्वपूर्ण अशा उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना थेट ‘इस्त्रो’ आणि अमेरिकेतील ‘नासा’ या जगप्रसिद्ध संस्थांना भेटी देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. विविध प्रकारच्या प्रयोगातून प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विभागाकडून विशेष बक्षीसही दिले जाते. त्या बक्षिसाच्या रकमेत १० पटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. आता त्यात ‘मुख्यमंत्री विज्ञान वारी’ या नव्या उपक्रमाच्या घोषणेमुळे राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी मोठे बळ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
--
सात हजार ५५४ कोटी अखर्चित
मागील वर्षी शालेय शिक्षणसाठी एक लाख पाच हजार ४७३ कोटी ६३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा त्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. ही तरतूद एक लाख सात हजार ७०३ कोटी ४१ लाख इतकी करण्यात आली आहे. मात्र, मागील वर्षी करण्यात आलेल्या तरतुदींपैकी सात हजार ५५४ कोटी रुपये अखर्चित राहिले आहेत. यामुळे शालेय शिक्षणातील विविध उपक्रमांच्या विकासावर त्याचे परिणाम झाल्याची प्रतिक्रिया समर्थन संस्थेचे शिक्षणविषयक प्रमुख रूपेश कीर यांनी दिली. जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था, शिक्षकांच्या रिक्त जागा आदी असंख्य प्रश्न असूनही निधी अखर्चित ठवल्याने राज्यातील शोषित, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा हा प्रकार असल्याची टीकाही कीर यांनी केली आहे. तसेच हा अर्थसंकल्प सामाजिक क्षेत्रांवर अन्याय करणार असल्याचेही ते म्हणाले.
–
उच्च शिक्षणाच्या तरतुदींना कात्री
यंदाच्या अर्थसंकल्पात उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात निधीला कात्री लावण्यात आली आहे. मागील वर्षी २०२५-२६ मध्ये १६ हजार ६७८ कोटी दोन लाख इतकी तरतूद करूण्यात आली होती. यंदा ती १५ हजार ६७४ कोटी ५४ लाख इतकी आहे.
--
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय ‘एज्युसिटी’
राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उच्च शिक्षण मिळावे यासाठी नवी मुंबईत ‘एज्युसिटी’ साकारण्यात येत आहे. या ठिकाणी सहा देशांची विद्यापीठे याच वर्षी सुरू होणार आहेत. याच धर्तीवर राज्यात आणखी ८ ते १० शैक्षणिक शहरे विकसित करण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पातून ठेवण्यात आले आहे.
--
परदेशी नोकऱ्यांसाठी ‘महिमा’
तरुणांना परदेशात नोकऱ्यांची संधी मिळवून देण्यासाठी ‘महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट’ (महिमा) या नव्या संस्थेची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत परदेशी नोकऱ्यांसाठी आवश्यक असणारे भाषा व कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. यासोबतच, विद्यार्थ्यांच्या समुपदेशन सेवेचा विस्तार करण्यासाठी आणि या व्यवस्थेला अधिक संघटित स्वरूप देण्यासाठी राज्यात ३६ ‘नवदिशा केंद्र’ स्थापन केली जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

