थकबाकीदारांवर पालिकेचा दणका
थकबाकीदारांवर पालिकेचा दणका
३४ मालमत्तांच्या ई-लिलावाची प्रक्रिया सुरू; ५४८ कोटींचा कर बाकी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः मालमत्ता कर थकविणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांविरोधात पालिकेने कठोर पावले उचलत जप्ती व लिलाव कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने एकूण ३४ मालमत्तांना ई-लिलाव प्रक्रियेअंतर्गत दीर्घ मुदतीची नोटीस जारी केली आहे. त्यात मोकळे भूखंड, व्यावसायिक इमारत, हॉटेल आणि संमिश्र वापराच्या मालमत्तांचा समावेश आहे. या ३४ थकबाकीदार आस्थापनांकडे दंड रकमेसह एकूण ५४८ कोटी ६९ लाख ८२ हजार ४८७ रुपये इतकी मोठी थकबाकी प्रलंबित आहे.
दीर्घ मुदतीच्या नोटिसीची कालमर्यादा संपलेल्या ११ मालमत्तांंची प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया सुरू करत इच्छुक खरेदीदारांकडून बोली निविदा मागविण्यात आल्या आहेत. लिलाव प्रक्रिया सुरू होताच पाच मालमत्ताधारकांनी १० कोटी ४५ लाख रुपयांचा थकीत कर भरणा केला आहे.
मालमत्ता कर थकविणाऱ्या आस्थापनांविरोधात कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
करदात्यांनी निर्धारित मुदतीत थकीत कराची भरपाई करून दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे; मात्र सातत्याने नोटीस देऊन व पाठपुरावा करूनही करभरणा करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात आता पालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अशा थकबाकीदारांवर जप्ती व अटकावणीची ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
करवसुलीसंदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याकामी मालमत्ता लिलावाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या सर्व थकबाकीदारांना करभरणा करण्यासाठी २१ दिवसांची दीर्घ नोटीस बजाविण्यात आली आहे. या मुदतीत करभरणा न केल्यास विहित कार्यपद्धतीनुसार, लिलाव प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

