जागतिक दर्जाचे ससून मासेमारी बंदर उभारणार
जागतिक दर्जाचे ससून मासेमारी बंदर उभारणार
फिनलंडच्या तीन कंपन्यांशी सामंजस्य करार; स्वच्छता, पुनर्वापर आणि आधुनिकीकरणावर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईतील ससून मासेमारी बंदराला जागतिक दर्जाचे, स्वच्छ आणि आधुनिक मासेमारी केंद्र म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी फिनलंडमधील तीन कंपन्यांशी सामंजस्य करार करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली.
मुंबईतील ताज पॅलेस हॉटेल येथे शनिवारी (ता. ७) झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ आणि फिनलंडमधील हेल्वर, मिरासिस व रिव्हर रीसायकल या कंपन्यांदरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी फिनलंडचे कॉन्सुल जनरल एरिक अफ हॅलोस्ट्रॉम, इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राज्य सचिव जुका सोलोवारा, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त विजय सूर्यवंशी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपाले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री राणे म्हणाले, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीतील जुना ससून डॉक तसेच राज्य व केंद्र शासनाच्या अखत्यारीतील नवीन डॉक आज मच्छीमारांसाठी महत्त्वाचे आर्थिक केंद्र ठरले आहे. सुमारे १,५६० नोंदणीकृत यांत्रिक मासेमारी नौका येथे कार्यरत असून, दरवर्षी सरासरी ५० ते ६० हजार मेट्रिक टन मासळी उत्पादन या बंदरातून होते. त्यामुळे राज्याच्या तसेच देशाच्या मत्स्य अर्थव्यवस्थेत ससून डॉकचे महत्त्वाचे स्थान आहे.
पायाभूत सुविधांचा विस्तार
गेल्या काही वर्षांत येथे नेट मेंडिंग शेड, कार्यशाळा, भूमिगत पाण्याची टाकी, पाणीपुरवठा पाइपलाइन, पंपहाउस, संरक्षण भिंत, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि सुरक्षा रक्षक कक्षांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. कचराकुंड्यांची व्यवस्था, जुन्या संरचना हटविणे, विद्युत उपकेंद्रासाठी बांधकामही करण्यात आले आहे. सध्या बर्फनिर्मिती प्रकल्प, घाटाच्या भिंतीचे मजबुतीकरण, मच्छीमारांसाठी विश्रांती कक्ष आणि आधुनिक लिलाव हॉलची कामे सुरू आहेत.
पुनर्वापर आणि डिजिटायझेशन
या सामंजस्य कराराअंतर्गत प्लॅस्टिक कचऱ्याचा पुनर्वापर, टाकून दिलेल्या मासेमारी जाळ्यांचे पुनर्चक्रण, नेट दुरुस्ती व्यवस्थेचे बळकटीकरण यावर विशेष भर दिला जाणार आहे. ससून बंदराला सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच डिजिटायझेशनलाही चालना दिली जाईल, असे राणे यांनी सांगितले. मच्छीमारांच्या कल्याणासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि शाश्वत किनारी विकास साधणे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. ससून डॉकला जागतिक मानकांनुसार आदर्श मासेमारी बंदर बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

