थकबाकीदारांवर बडगा
वाशी, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली विभागात थकीत पाणी बिलधारकांविरोधात पाणीपुरवठा विभागाने आक्रमक भूमिका घेत धडक कारवाई सुरू केली आहे. १० हजारांपेक्षा अधिक पाणी देयक थकीत असलेल्या तब्बल ८०० ग्राहकांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३०२ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या या कठोर कारवाईमुळे घणसोली परिसरात थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई महापालिकेकडून शहरातील पाणी देयक वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षाचा शेवट जवळ आल्यामुळे ३१ मार्चपूर्वी थकीत रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाने अधिक तीव्र कारवाई केली आहे. घणसोली विभागात मोठ्या प्रमाणात पाणी देयक थकीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने थकबाकीदारांविरोधात थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.
घणसोली विभागात १० हजार रुपयांपेक्षा जास्त पाणी देयक थकीत असलेल्या सुमारे ८०० ग्राहकांची यादी तयार करण्यात आली असून, या सर्वांना पालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. नोटीस देऊनही अनेकांनी थकीत रक्कम न भरल्याने प्रशासनाने थेट नळजोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ३०२ जणांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असून, ही मोहीम पुढील काही दिवसांत आणखी वेगाने राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार अतिरिक्त सहशहर अभियंता अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कार्यकारी अभियंता शंकर जाधव, उपअभियंता अजित भवारी आणि कनिष्ठ अभियंता नितीन जाधव यांच्या पथकाने कंत्राटदार श्री राज इंटरप्रायझेस यांच्या सहकार्याने घणसोली परिसरात थकीत पाणी बिलधारकांवर कारवाई सुरू केली आहे.
या मोहिमेदरम्यान थकीत पाणी बिलधारकांसोबतच अनधिकृत नळजोडणीधारकांवरही पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. थकीत देयक न भरता पाणीपुरवठ्याचा वापर करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत असून, अशा ३०२ जणांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. तसेच थकबाकीदारांची यादी तयार करून टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
३१ मार्चपर्यंत मुदत
३१ मार्चपूर्वी सर्व थकीत पाणीबिल तातडीने भरावे अन्यथा नळजोडणी खंडित करण्यासह पुढील कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे.
पालिका कार्यालयाकडे धाव
पालिकेच्या या धडक मोहिमेमुळे घणसोली परिसरातील थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून, अनेकांनी थकीत रक्कम भरण्यासाठी पालिकेच्या कार्यालयाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे.
इतर विभागांमध्येही मोहीम
शहरातील इतर विभागांमध्येही अशाच प्रकारची मोहीम राबविण्याचा पालिका प्रशासनाचा मानस असल्याची माहिती मिळत असून, थकीत देयकदारांवर आगामी काळात आणखी कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

