‘हरित भविष्याच्या दिशेने’ वॉक-अ-थॉन
माजी विद्यार्थ्यांचे वॉकेथॉन उत्साहात
प्रभादेवी, ता. ८ ः पर्यावरण संवर्धनाचा ठाम संदेश देत हरित आणि निरोगी भविष्याची जाणीव समाजात दृढ करण्याच्या उद्देशाने कीर्ती एम. डुंगरसी महाविद्यालयात प्रथमच माजी विद्यार्थी वॉकेथॉन उत्साहात झाले. या उपक्रमात एक हजार माजी विद्यार्थी, ३० निवृत्त प्राध्यापक, २०० हून अधिक स्वयंसेवक तसेच ३०० पेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. नील हेळेकर आणि परिषद सदस्य डॉ. एम. बी. केकरे यांच्या हस्ते वॉकेथॉनचा प्रारंभ करण्यात आला. सामूहिक सहभागातून पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे या वेळी सांगण्यात आले. मराठी चित्रपट व दूरदर्शन क्षेत्रातील नामांकित कलाकार तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी वनिता खरात आणि रोहित माने यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. त्यांच्या सहभागामुळे माजी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
संरक्षण, प्रशासन, माध्यम, साहित्य-चित्रपट, क्रीडा, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवर माजी विद्यार्थ्यांनी या वेळी सहभाग घेतला. यामध्ये लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) हेमंत दांडेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम, राष्ट्रीय पुरस्कारविजेते दिग्दर्शक रमेश मोरे, पत्रकार विजय साळवी तसेच शिवछत्रपती पुरस्कारविजेती ज्योती पाटील यांचा समावेश होता. तसेच १९६०च्या दशकातील माजी विद्यार्थिनी व महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या रतन सेगू आणि वैद्यकीय क्षेत्रातील पहिले माजी विद्यार्थी डॉ. अरविंद दाभोळकर यांची उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.
महाविद्यालय ही केवळ शिक्षणसंस्था नसून व्यक्तिमत्त्व घडवणारी कार्यशाळा आहे. विद्यार्थी संस्था सोडतो; मात्र संस्था त्याच्या मनातून कधीच दूर जात नाही, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल मार्कंडेय यांनी सांगितले. तसेच माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी आणि करिअर संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
गेल्या काही वर्षांत संस्थेने शैक्षणिक गुणवत्ता, डिजिटल शिक्षण, संशोधन, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे सीएसआर निधीतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध होत असून ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि वर्गखोल्यांचे आधुनिकीकरण करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रमोहन जोशी आणि विद्यार्थी साईदत्त बाली यांनी केले, तर आभार प्रदर्शन माधुरी जोग यांनी केले. माजी प्राचार्य डॉ. डी. व्ही. पवार, सुहास लेले, दीपक सावंत, प्रणव मेहता, ज्ञानेश्वर मर्गज, भूपेश दवे आणि राजेश दुबे यांनी माजी विद्यार्थ्यांशी समन्वय साधत कार्यक्रमाच्या नियोजनात मोलाचे सहकार्य केले. माजी विद्यार्थी समितीच्या अध्यक्षा डॉ. ऊर्मिला सरकार यांच्या नेतृत्वाखाली आयोजन समितीने कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

