अखेर केडीएमसीच्या सर्वसाधारण सभेला मुहूर्त मिळाला
अखेर सर्वसाधारण सभेला मुहूर्त
१६ मार्चला होणार स्थायी समिती सदस्यांची निवड
कल्याण, ता. ७ (वार्ताहर) ः गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. सोमवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता ही बहुचर्चित सभा पार पडणार आहे. या सभेमध्ये स्थायी समितीसह विविध महत्त्वाच्या समित्यांवरील निवडी होणार आहे. त्यामुळे या समित्यांवर कोणाची वर्णी लागते याची राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
कल्याण-डोंबिवली पालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर महापौर निवड झाली होती. मात्र, महापौर निवड होऊन सुद्धा सर्वसाधारण सभा जाहीर झाली नव्हती. मनसे आणि शिवसेना पक्षातील कार्यकर्ते ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आले. मात्र, ठाकरे गटातून निवडून येऊन देखील कोकण विभागीय आयुक्तांकडे तीन नगरसेवकांनी नोंदणी न केल्याने पेच प्रसंग निर्माण झाला आहे. यावर तोडगा कसा काढावा यासाठी पालिकेची बहुचर्चित सर्वसाधारण सभा लांबली होती. अखेर या सभेला मुहूर्त मिळाला असून याबाबतचे परिपत्रक सचिव किशोर शेळके यांनी काढले आहे.
सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या पालिका सदस्यांपैकी १६ व्यक्तींची स्थायी समिती सदस्य पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, नागरी दलित वस्ती आणि झोपडपट्टी पुनर्वसन समिती, शिक्षण समितीमध्ये सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. २०२६-२०२७ या वर्षाकरीता मालमत्ता कराचे दर ठरविण्यात येणार आहे. या सभेत शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या विकासकामांच्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. पालिका हद्दीतील मोठ्या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर सफाईसाठी चार कोटी २९ लाख ९२ हजार १५७ रुपयांच्या खर्चास मान्यता देणे. रस्त्यांची देखभाल दुरुस्तीसाठी ३४ कोटी ३६ लाख ८२ हजार रुपये खर्चास मान्यता देणे. उल्हास नदीस मिळणाऱ्या गाळेगांव व मोहने नाल्यामधील सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सहा कोटी ४७ लाख १४ हजार १०५ रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देणे आदी विषय सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. याचसोबत इतर पालिका सदस्यांनी मांडलेले विषय देखील घेण्यात येणार आहे.
समित्यांची रचना
स्थायी समिती : १६ सदस्यांची नियुक्ती
महिला व बालकल्याण समिती : ११ सदस्यांची नियुक्ती
शिक्षण समिती : ११ सदस्यांची नियुक्ती
सभापती पदासाठी शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच
तिजोरीच्या चाव्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष इच्छुक आहेत. सभापती पद आपल्याकडे मिळविण्यासाठी भाजप-सिवसेना पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. यामुळे सभापती पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

