वाणगावात शिवजयंतीचा उत्सव
वाणगावात तिथीनुसार शिवजयंती साजरी
वाणगाव, ता. ८ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने राष्ट्र सुजलाम्-सुफलाम्, समृद्ध आणि सर्वधर्मसमभावाने नांदणारे बनवण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन गुरुकुल शिक्षण संकुलाचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी केले. वाणगाव स्टेशन येथे तिथीनुसार आयोजित शिवजयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी शिवरायांना स्मरून राष्ट्रनिर्मिती, महिलांचा सन्मान, अन्नदान-विद्यादान यासाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. शिक्षणाने मिळवलेली पदे क्षणभंगुर असतात; मात्र त्या पदाला न्याय देण्यासाठी अहंभाव बाजूला ठेवून प्रत्यक्ष कामात उतरले पाहिजे, असेही मिलिंद पाटील यांनी या वेळी सांगितले. वाणगाव स्टेशन परिसरात तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला वाणगाव पंचक्रोशीतील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, नागरिक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवरायांच्या मावळ्यांनी शिवगर्जना करीत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पाडला.
महाराजांचे साम्राज्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून त्यांचे विचार संपूर्ण जगभर प्रेरणादायी ठरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाची भूमिका स्वीकारत स्वराज्य उभे केले. त्यांच्या किल्ल्यांवर मुस्लिम सैनिकांसाठी दर्ग्याची व्यवस्था करण्यात आली होती, यावरून त्यांच्या सर्वसमावेशक विचारसरणीची जाणीव होते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. आपण शिवाजी महाराज नसू शकतो, मात्र त्यांच्या विचारसरणीचा स्वीकार करून समाजनिर्मितीत योगदान देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र पाटील, वाणगाव परिसरातील ज्येष्ठ उद्योजक नरेशभाई कंसारा, प्रदेश काँग्रेस सचिव कॅप्टन सत्यम ठाकूर, तरुण उद्योजक नितेश पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीचे आयोजन संदीप पाटील, तुषार पाटील, भूषण पाटील, धनंजय पाटील, महेश राऊत, विलास राऊत आणि शिवभक्तांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

