आसनगावची कृषीपंढरी भाजीपाल्यांनी फुलली
आसनगावची कृषीपंढरी भाजीपाल्याने फुलली
शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय खतांचा वापर
वाणगाव, ता. ८ (बातमीदार) : आजचे कृषीचे विद्यार्थी हे उद्या भविष्यात शेतकरी आणि शेतीपूरक व्यावसायिक होणार आहेत. शेती आणि व्यवसाय करीत असताना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थीदशेतच अवगत व्हावे, शेती आणि व्यवसायात उत्तम पारंगत व्हावे, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कृषितंत्र विद्यालय, आसनगावच्या प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे. पाच एकर क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय खतांचा वापर करून विविध भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. सध्या उत्पादन सुरू झाले असून, चांगला नफा मिळत असल्याचे कृषी विद्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
कृषितंत्र विद्यालय, आसनगावच्या विद्यार्थ्यांनी नवीन फळझाडे लागवड, वेलवर्गीय भाज्या, कोबीवर्गीय भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या इत्यादींसह शाश्वत उत्पादन देणाऱ्या पिकांचीही लागवड करण्यात आली आहे. काकडी, खरबूज, कलिंगड लागवडीसह सूर्यफूल, फुलशेतीचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांना शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान देऊन आत्मसात करण्यासाठी कृषितंत्र विद्यालयाचे प्रा. प्रवीण भोये, प्रा. दिलीप पवार, प्रा. निशांत कासट यांची विशेष मेहनत आहे.
---------------------
आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर
- रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे आणि निळे चिकट सापळ्यांचा वापर भाजीपाला पिकात करण्यात आला आहे.
- ठिबक किंवा सूक्ष्म सिंचन प्रणालीद्वारे पिकांना पाणी देतानाच पाण्यात विरघळणारी खते देतात यालाच फर्टिगेशन असे म्हणतात. आधुनिक पद्धतीत खते थेट मुळांजवळ पोहोचतात. यामुळे खतांची कार्यक्षमता वाढते, पाण्याची बचत होते आणि पिकांच्या गरजेनुसार पोषक तत्त्वे देता येतात.
- जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी आणि तणांच्या बंदोबस्तासाठी आच्छादनाचा (मल्चिंग) वापर शेती पद्धतीमध्ये करण्यात आला आहे. सर्व पिकांना पाणी सम प्रमाणात उपलब्ध व्हावे, पाण्याची बचत व्हावी या दृष्टिकोनातून ठिबक सिंचन या आधुनिक पद्धतीचा वापर करून पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
-----------------
उत्पादनास सुरुवात
काकडी, स्ट्रॉबेरी, मिरची, दुधी, शिराळे, वांगी, कोबी कलिंगड, खरबूज यांसह अनेक भाजीपाला पिकांचे उत्पन्न सुरू झाले आहे. वाणगाव, बोईसर अशा स्थानिक ठिकाणी हक्काची बाजारपेठ उपलब्ध असल्याने विक्रीही होत आहे. विद्यार्थी स्वतः विक्री व्यवस्थापनाचे अनुभव घेत आहेत.
------------------------
उत्पादनक्षम दुर्मिळ पिकांची लागवड विद्यालयाच्या प्रक्षेत्रावर झाली आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात शेती आणि पूरक व्यवसायात यशस्वी होण्यासाठी असे नावीन्यपूर्ण उपक्रम विद्यालयाच्या प्रक्षेत्रावर राबविण्यात येत आहेत. बदलत्या निसर्गाच्या चक्रामुळे शाश्वत उत्पादन साध्य होत नसल्याने शेतकऱ्यांनी परिस्थितीनुसार पीक पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञान वापरावे.
- प्रा. प्रवीण भोये, प्राध्यापक, कृषितंत्र विद्यालय, आसनगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

