जागेच्या वादातून दोन समाज आमनेसामने
अंबरनाथ, ता. ८ (वार्ताहर) : जागेच्या वादातून चिखलोली ठाकूरपाडा परिसरात दोन समाजांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला आहे. आदिवासी बांधवांची घरे, झाडे, कोंबड्यांची खुराडी, जनावरांचे निवारे जेसीबीच्या साह्याने पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त आदिवासी बांधवांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ पूर्व येथील आनंदनगर एमआयडीसी परिसरातील चिखलोली ठाकूरपाडा येथे सुमारे १०० आदिवासी नागरिकांची वस्ती आहे. या वस्तीला लागूनच सुमारे ११ एकर ४० गुंठे गुरुचरण जागा आहे. त्या ठिकाणी आदिवासी बांधवांनी झोपड्या, कोंबड्यांची खुराडी; तसेच विविध प्रकारची झाडे लावली होती. संबंधित जागा सातबाऱ्यानुसार पवार कुटुंबीयांची असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, कोणतीही पूर्वसूचना, नोटीस किंवा मुदत न देता अचानक जेसीबीद्वारे तोडक कारवाई केल्याचे आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे. वर्षानुवर्षांची जुनी व फळझाडेही बुधवारी सकाळी तोडण्यात आली. या वेळी उपस्थित महिलांना शिवीगाळ करून पुरुषांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या गोंधळात अनुसया हिरवे आणि शांताबाई उघडे या दोन वृद्ध महिला जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच झाडांखाली कोंबड्यांची खुराडी आणि जनावरांचे निवारेही गाडल्याचा दावा करण्यात आला आहे. घाबरलेल्या आणि संतप्त आदिवासी बांधवांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत सोमनाथ पवार, लक्ष्मण पवार, राजेश पवार, जयेश पवार, निखिल पवार, रामदास पवार, संदीप पवार, बंटी पवार आणि संदेश पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडित महिलांनी नवनिर्वाचित नगरसेविका पायल सोरखदे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
आम्ही गरीब आदिवासी असल्यामुळे वारंवार अन्याय होत आहे. सरकार ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे सांगते; मात्र आम्ही लावलेली झाडेच तोडली जात आहेत. झाडे तोडू नका असे सांगण्यासाठी गेलेल्या माझ्या वडिलांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही कारवाई आमच्या संस्कृतीवर घाव आहे. सरकारने आमचे पुनर्वसन करावे.
- सुनीता वारखडा, प्रत्यक्षदर्शी
आम्ही पिढ्यानपिढ्या येथे राहत असून घरपट्टीही भरत आहोत. अचानक झाडे पाडण्यासाठी जेसीबी फिरवण्यात आला. मोठी झाडे कोसळताना आम्ही थोडक्यात बचावलो; अन्यथा एखाद्या झाडाखाली गाडले गेलो असतो.
- अनुसया हिरवे, जखमी महिला
आरोप फेटाळले
या प्रकरणातील सर्व आरोप सोमनाथ पवार व त्यांच्या कुटुंबीयांनी फेटाळले आहेत. होळीपूर्वी झाडे, झोपड्या आणि अतिक्रमण हटवण्याबाबत तोंडी सूचना दिली होती. तसेच कायदेशीर सर्व्हे करण्यासाठी त्यांच्या ७/१२ उताऱ्यावर असलेले अतिक्रमण हटवण्यासाठीच झाडे तोडण्याची कारवाई केल्याचा दावा सोमनाथ पवार यांनी केला आहे.
अंबरनाथ : चिखलोली ठाकूरपाड्यातील आदिवासी बांधवांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

