मुलुंडमध्ये महाराजस्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलुंडमध्ये महाराजस्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलुंड, ता. ८ (बातमीदार) : मुलुंड पूर्व येथे तहसीलदार कार्यालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला तहसीलदार कार्यालयाने आयोजित केलेले हे शिबिर शनिवारी (ता. ७) मुलुंड येथे पार पडले. विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. नगर भूमापन अधिकारी फेगडे यांनी प्रास्ताविकात या अभियानाचा उद्देश व नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची माहिती दिली. उपस्थित लोकप्रतिनिधींनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांनी अशा शिबिरांचा लाभ घेऊन आपली प्रलंबित कामे मार्गी लावावीत, असे आवाहन केले. मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेचा उल्लेख करत त्यांच्या नावाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानामुळे नागरिकांच्या अडचणी दूर करण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणी होणाऱ्या शिबिरांचाही नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिरात तहसीलदार कार्यालयासह नगर भूमापन कार्यालय, मुंबई महापालिका, संजय गांधी योजना विभाग, शिधावाटप विभाग आणि नोंदणी विभाग अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. येथे विविध दाखले, आधार नोंदणी दुरुस्ती, फेरफारविषयक मार्गदर्शन आदी सेवा देण्यात आल्या. सुमारे १,२०० हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या आयोजनासाठी रावसाहेब बाळाराम ठाकूर विद्यालयाचे अध्यक्ष आनंद प्रधान यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी मुलुंडच्या नगरसेविका दीपिका घाग, हेतल मोर्वेकर, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कणसे, उपविभागीय अधिकारी कल्पना गोडे, उपजिल्हाधिकारी अविनाश कोष्टी, प्रीती पाटील, कुर्ला तहसीलदार दिलीप रायण्णावर, संजय गांधी योजनेचे तहसीलदार विनायक थवील तसेच ईशान्य मुंबईतील नगर भूमापन अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

