‘टीएमटी’चा जुना ताफा नव्या रुपात!

‘टीएमटी’चा जुना ताफा नव्या रुपात!

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : भंगाराच्या दिशेने जाणाऱ्या तब्बल २४० डिझेल बसचे सीएनजीत रूपांतर करण्याचा महत्त्वाचा निर्णय ठाणे पालिकेच्या परिवहन सेवेने घेतला आहे. सुमारे २० कोटींचा हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या बसची कालमर्यादा आणखी पाच वर्षे वाढणार आहे. या निर्णयामुळे नव्या गाड्या खरेदीवरील शेकडो कोटींचा खर्च टळणार असून प्रदूषणातही घट होणार आहे.

सध्या टीएमटीकडे सुमारे ४०० ते ४५० बस आहेत. ठाणे शहराच्या विविध मार्गांवरून या गाड्या धावत आहेत. असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून ठाणे पालिकेच्या परिवहन सेवेचा डोलारा डगमगला आहे. आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे; मात्र तरीही ठाणेकरांना स्वस्त आणि जलद प्रवास देण्यासाठी टीएमटीकडून नवनवीन योजना राबवण्यात येत आहेत. त्यानुसार केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेअंतर्गत ३०३ नवीन ई-बस घेण्याचे नियोजन आहे.

सध्या ताफ्यात सुमारे १२३ ई-बस कार्यरत आहेत. शंभर सीएनजी बसही ताफ्यात येणार आहेत. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६० आसन क्षमता असलेल्या नवीन डबल डेकर बस सुरू करण्याचे नियोजन आहे. असे असले तरी दुसरीकडे टीएमटीच्या ताफ्यातील २४० डिझेल बसची १० वर्षांची वयोमर्यादा येत्या ऑगस्टमध्ये पूर्ण होत आहे. नियमानुसार त्यानंतर या बससेवेतून बाद कराव्या लागणार आहेत.

नवीन योजनेतील बस येण्यास आणखी कालावधी लागणार आहे. आताच्या बसची सेवा अपुरी पडत असताना २४० वाहने भंगारात काढणे टीएमटीला परवडणारे नाही. यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने या बस भंगारात काढण्याऐवजी त्यांचे सीएनजीमध्ये रूपांतर करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. यानंतर संबंधित वाहनांची वयोमर्यादा आणखी पाच वर्षांनी वाढणार असून प्रवाशांची सेवा पूर्ववत ठेवण्यास मदत होणार असल्याची माहिती परिवहन सेवेचे अधिकारी भालचंद्र बेहरे यांनी दिली.

वाटाघाटीतून खर्चात मोठी कपात
या प्रकल्पासाठी सुरुवातीला प्रति बस सुमारे १० लाख रुपये खर्च अपेक्षित होता; मात्र परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी महानगर गॅस लिमिटेडसोबत केलेल्या वाटाघाटीतून प्रति बस सुमारे दोन लाख ७० हजारांची सूट मिळविण्यात यश आले. त्यामुळे प्रति बस खर्च सुमारे साडेसात ते आठ लाखांपर्यंत खाली आला. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चात सुमारे सहा कोटींची बचत होणार आहे.

आर्थिक परिस्थितीत दिलासा
टीएमटीची आर्थिक स्थिती सध्या बेताची असल्याने मोठ्या प्रमाणात नवीन बस खरेदी करणे महापालिकेसाठी कठीण होते. अशा परिस्थितीत विद्यमान बसचे सीएनजीमध्ये रूपांतर हा पर्याय प्रशासनाने निवडला. यामुळे इंधन खर्चातही लक्षणीय बचत होण्याची शक्यता आहे.

पर्यावरणपूरक पाऊल
डिझेलच्या तुलनेत सीएनजी इंधन कमी प्रदूषणकारक असल्याने शहरातील वायू प्रदूषणात घट होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच नियमित बससेवा उपलब्ध राहणार असल्याने सार्वजनिक वाहतुकीवर होणारा परिणामही टळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com