ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची दारे खुली

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची दारे खुली

Published on

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची दारे खुली
रयतच्या महाविद्यालयात कला मंच व एआय केंद्राचे उद्‍घाटन

मोखाडा, ता. ८ (बातमीदार) : रयत शिक्षण संस्थेच्या मोखाड्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कला मंच व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) केंद्राचे उद्‍घाटन तसेच वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे होते, तर उद्‍घाटन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झाले.
उद्‍घाटनप्रसंगी बोलताना चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा व शिका’ या तत्त्वज्ञानाचा उल्लेख करीत शिक्षणासोबत कौशल्य विकासाला महत्त्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन केले. आजचे युग तंत्रज्ञानाचे असून कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यातील प्रगतीची महत्त्वाची दिशा ठरत आहे. महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राची स्थापना ही स्तुत्य बाब असून, यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणूनही त्यांनी महाविद्यालयाचा गौरव केला.
या वेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा गौरव करीत ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनविण्याचे कार्य संस्थेने सातत्याने केले असल्याचे सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळून त्यांच्या करिअर घडण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात ॲड. भगीरथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की आजच्या आधुनिक युगात शिक्षणासोबत तंत्रज्ञानाचे ज्ञान अत्यावश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली असून, विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून समाजाच्या विकासात योगदान द्यावे. कला मंचसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक पारितोषिके व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. तसेच शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल पीएचडीधारक प्राध्यापकांचाही सन्मान करण्यात आला. या वेळी माजी आमदार सुनील भुसारा, डी. बी. पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, नगराध्यक्ष अमोल पाटील, विकास देशमुख, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. राजेंद्र मोरे, वाय. टी. देशमुख, प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे, बंडू पवार, मोहन कोंगरे, कवी, लेखक सुभाष सोनकांबळे तसेच कुणाल लाडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. चांदोरे, उपप्राचार्य डॉ. एस. जी. मेंगाळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही. एम. मोरे, जिमखाना विभागप्रमुख प्रा. व्ही. एम. डोंगरदिवे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास परिसरातील मान्यवर नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. के. के. पारधी आणि प्रा. आर. डी. घाटाळ यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com