गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ ः पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली गॅसटंचाई आणि केंद्र सरकारने लागू केलेले नवीन निर्बंध यामुळे नवी मुंबईतील सानपाडा आणि तुर्भे परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. गॅस वितरण कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या वाटपावर नवीन मर्यादा आणल्याची माहिती मिळताच, सानपाडा येथील एजन्सीबाहेर शेकडो नागरिकांनी रिकामे सिलिंडर घेऊन लांबच लांब रांगा लावल्या होत्या.
दोन सिलिंडरमधील बुकिंगचे अंतर आता २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आले आहे. तसेच वर्षाला केवळ १५ सिलिंडरची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या नियमावलीमुळे सानपाडा सेक्टर ५, ११ आणि ३० मधील ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तुर्भे स्टोअर आणि इंदिरानगरसारख्या भागांत घरपोच डिलिव्हरी मिळत नसल्याने नागरिक आधीच त्रस्त होते. त्यातच आता संभाव्य टंचाईच्या बातमीने नागरिकांनी थेट गॅस एजन्सीची कार्यालये गाठली आहेत.
स्थानिक नागरिक संतोष मौर्य यांनी सांगितले, की गेल्या अनेक दिवसांपासून आम्हाला वेळेवर गॅस मिळत नव्हता. आता नवीन निर्बंधांमुळे आमचे बजेट कोलमडणार आहे. गॅस संपला तर २५ दिवस वाट पाहावी लागेल, या विचाराने आम्ही रिकामे सिलिंडर घेऊन रांगेत उभे आहोत. गॅस वितरकांनी नागरिकांना घाबरू नका, असे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात वितरणात होणारा विलंब लोकांची चिंता वाढवत आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी सानपाडा आणि तुर्भे येथील रहिवाशांनी केली आहे. या इंधन संकटाचा परिणाम केवळ घरगुती वापरापुरता मर्यादित नसून, नवी मुंबईतील व्यावसायिक क्षेत्रावरही त्याचे गंभीर परिणाम झाले आहेत.
खानावळ आणि हॉटेल व्यवसायावर संकट
नवी मुंबई हा हजारो विद्यार्थी आणि कामगारांचा हब आहे. येथील लहान हॉटेल्स आणि मेस चालवण्यासाठी व्यावसायिक सिलिंडरचा वापर होतो. व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ११५ रुपयांची वाढ झाल्याने आणि पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने खानावळचालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठ्यावर निर्बंध आले आहेत, त्यामुळे व्यावसायिकांचे समीकरण बिघडले आहे.
पाइप गॅस असणाऱ्यांवर संकट?
नवी मुंबईत अनेक रहिवासी सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाइप गॅसद्वारे घरगुती स्वयंपाक केला जातो. दिघा, ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली, वाशी, सानपाडा, तुर्भे, जुईनगर, नेरूळ, सीवूड्स आणि बेलापूरपर्यंत महानगर कंपनीतर्फे गॅस लाइनद्वारे गॅसपुरवठा होतो. पनवेल, खारघर, कामोठे, नवीन पनवेल या भागातसुद्धा गॅस पाइपद्वारे पुरवठा होतो. देशात पीएनजी गॅसपुरवठा खंडित झाल्यास या एवढ्या मोठ्या परिसरातील किमान तीन लाख लोकसंख्येवर संकट येऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

