गर्भवती महिलेची प्रसुतीसाठी फरपट

गर्भवती महिलेची प्रसुतीसाठी फरपट

Published on

गर्भवती महिलेची प्रसूतीसाठी फरपट
डहाणू उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर नसल्याने धावपळ
कासा, ता. ९ (बातमीदार)ः डहाणू तालुक्यातील एका गर्भवती महिलेला उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला आहे. या घटनेमुळे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना डहाणू तालुक्यातील वडकुन येथील दर्शना माच्छी या गर्भवती महिलेची प्रसूतीसाठी फरपट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात (कॉटेज हॉस्पिटल) प्रसूतीच्या वेळी डॉक्टर नसल्याने उपचार करण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. जवळपास तासाभरानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी महिलेला धुंदलवाडी येथील खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता, पण उपचारातील दिरंगाईमुळे महिलेची प्रकृती खालावल्याची परिस्थिती उद्भवली होती. या प्रकारामुळे एकीकडे माच्छी कुटुंबीयांना धावपळ करावी लागली, तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
----------------------------------------
महिला दिनाच्या दिवशीच जर गर्भवती महिलेला एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात धावपळ करावी लागत असेल, तर मोठी शोकांतिका आहे. सरकारी रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे महिलेला भरती करून घेतले जात नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
- शोभा माच्छी, अंगणवाडी सेविका, वडकुन
----------------------------------------
माझी पत्नी नऊ महिने उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र, प्रसूतीच्या वेळी उपचार मिळाले नाहीत. डॉक्टर नसल्याचे सांगून दुसरीकडे जाण्यास सांगितले. अंगणवाडी सेविका शोभा माच्छी यांनी मदत केल्यामुळे वेळेवर रुग्णालयात दाखल होणे शक्य झाले.
- सर्जन माच्छी, महिलेचा पती
----------------------------
डहाणू येथे घडलेल्या प्रकाराबाबत अधिक माहिती घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची जिल्हा स्तरावरून चौकशी करण्यात येईल. दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
- रामदास मराड, जिल्हा शल्यचिकित्सक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com