अर्थसंकल्पात मुरबाड रेल्वे हरवली

अर्थसंकल्पात मुरबाड रेल्वे हरवली
Published on

मुरबाड, ता. ९ (बातमीदार) : राज्याच्या अर्थसंकल्पात मुरबाड रेल्वेसाठी कोणतीही ठोस आर्थिक तरतूद केली नसल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेची प्रतीक्षा करणाऱ्या तालुक्यातील नागरिकांच्या अपेक्षांना यंदाच्या अर्थसंकल्पाने धक्का दिल्याची भावना व्यक्त होत आहे.
मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून निम्मा-निम्मा खर्च केला जाणार असल्याचे यापूर्वी सांगितले होते. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक तरतूद केली जाईल, अशी तालुक्यातील नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, ६ मार्चला जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाबाबत कोणतीही भरीव घोषणा किंवा निधीची तरतूद न झाल्याने नागरिकांनी निराशा व्यक्त केली आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर मुरबाड तालुक्यातील अनेक नागरिकांनी समाज माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. काही नागरिकांनी या प्रकल्पाबाबत सातत्याने चर्चा होत असली, तरी प्रत्यक्षात कामाला गती मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
तालुक्यातील औद्योगिक विकासाच्या दृष्टीनेही रेल्वे अत्यंत महत्त्वाची असल्याचे नागरिकांचे मत आहे. मुरबाड परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) विकसित झाले असून, हजारो तरुण शिक्षण घेऊन रोजगाराच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास रोजगाराच्या आणि उद्योगाच्या संधींना मोठी चालना मिळू शकते, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, रेल्वे प्रकल्पाबाबत सरकारने लवकरात लवकर स्पष्ट भूमिका घेऊन निधीची तरतूद करावी, अशी मागणी मुरबाडकरांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com