पनवेल विकासाचा आणखी नवा ट्रॅक!

पनवेल विकासाचा आणखी नवा ट्रॅक!

Published on

पनवेल, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील विकासाचा वेग गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढताना दिसत आहे. औद्योगिक विस्तार, वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणावर उभे राहत असलेले गृहप्रकल्प आणि उभारणीच्या टप्प्यात असलेले नवी मुंबई विमानतळ यामुळे पनवेल परिसर महाराष्ट्राच्या विकास नकाशावर केंद्रस्थानी येत आहे. अशा परिस्थितीत तळोजा-खांदेश्वर मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर रेल्वे, मेट्रो आणि विमानतळ यांची त्रिसूत्री जोडणी तयार होणार आहे. त्यामुळे पनवेल हा परिसर महत्त्वाचा ट्रान्झिट आणि लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली तळोजा एमआयडीसी ते खांदेश्वर मेट्रो मार्गिका ही केवळ वाहतूक सुविधा नसून पनवेलच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

सुमारे १०.३० किमी लांबीचा हा मेट्रो मार्ग उभारण्यासाठी अंदाजे पाच हजार ५७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर आठ मेट्रो स्थानके उभारली जाणार आहेत. त्यामुळे तळोजा, कळंबोली, कामोठे आणि पनवेल परिसरातील लाखो नागरिकांना आधुनिक, वेगवान आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार आहे. पनवेल शहर सध्या मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक मानले जाते. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे पनवेलचे धोरणात्मक महत्त्व प्रचंड वाढले आहे.

औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा
तळोजा एमआयडीसी हे नवी मुंबई परिसरातील एक मोठे औद्योगिक केंद्र आहे. येथे हजारो कामगार आणि कर्मचारी दररोज कामासाठी ये-जा करतात. सध्या या भागात वाहतुकीसाठी प्रामुख्याने रस्ते वाहतूक आणि रेल्वेवर अवलंबून राहावे लागते. मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर तळोजा एमआयडीसी, कळंबोली आणि कामोठे परिसरातील कामगार, कर्मचारी आणि व्यावसायिकांना जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे उद्योगधंद्यांनादेखील मोठी चालना मिळेल.

रिअल इस्टेट विकासाला चालना
पनवेल, कळंबोली, कामोठे आणि तळोजा परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहत आहेत. मेट्रो मार्गिका उभारली गेल्यास या भागातील मालमत्तेचे मूल्य वाढण्याची शक्यता आहे. मेट्रो, विमानतळ आणि महामार्ग यांची जोडणी मिळाल्यास पनवेल परिसर भविष्यातील ‘नवीन उपनगर’ म्हणून विकसित होऊ शकतो.

वाहतूक कोंडीवर उपाय
पनवेल आणि आसपासच्या परिसरात सध्या वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. कळंबोली, कामोठे आणि तळोजा परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

मेट्रो मार्गिकेची प्रमुख वैशिष्ट्ये
मार्ग लांबी : १०.३० किमी
एकूण खर्च : ५,५७५ कोटी
एकूण स्थानके : ८
प्रकल्प : नवी मुंबई मेट्रो लाईन-१चा विस्तार
मुख्य फायदा : तळोजा, कळंबोली, कामोठे आणि खांदेश्वर जोडणी
भविष्यातील जोडणी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

प्रस्तावित मेट्रो स्थानके :
एमआयडीसी स्टेशन १
एमआयडीसी स्टेशन २
रोडपाली सिग्नल
कळंबोली सेक्टर ७ ई
कळंबोली सेक्टर १३
कळंबोली सेक्टर २ ई
कामोठे सेक्टर २०
खांदेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com