खडकोलीत जागतिक महिला दिन उत्साहात

खडकोलीत जागतिक महिला दिन उत्साहात

Published on

खडकोलीत कर्तृत्ववान महिलांचा गौरव
विक्रमगड, ता. १० (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्त ह्युमन डेव्हलपमेंट मल्टिपर्पज फाउंडेशन यांच्या वतीने खडकोली येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रॅली, मार्गदर्शन सत्रे, हळदी-कुंकू समारंभ, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान तसेच महिलांसाठी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पालघरच्या उपनिरीक्षक प्राजक्ता पाटील यांचे मुलींनी लेझीम सादर करत उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्या तसेच उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी प्रज्वलित ज्योत ही स्त्रीशक्तीचे तेज, सामर्थ्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगण्यात आले. जशी ज्योत अंधार दूर करून प्रकाश पसरवते, तशीच प्रत्येक स्त्री आपल्या कर्तृत्वाने समाजात सकारात्मक परिवर्तन घडवते, असा संदेश देण्यात आला. यानंतर प्रमुख पाहुण्यांसह उपस्थित मान्यवर महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हळदी-कुंकू कार्यक्रमाची सुरुवात उपनिरीक्षक प्राजक्ता पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
मनोगत व्यक्त करताना प्राजक्ता पाटील यांनी स्त्रीशक्ती, समानता आणि महिलांच्या सशक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांचे शिक्षण, स्वावलंबन आणि समाजातील सक्रिय सहभाग याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच संस्थेमार्फत वंचित, गरजू, दिव्यांग, महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही दिली.
पालघर जिल्ह्यातून राष्ट्रीय स्तरावरील सीनियर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेत चेन्नई (२९ जानेवारी ते १ फेब्रुवारी) येथे महाराष्ट्र महिला संघाचे प्रतिनिधित्व करून विजेतेपद पटकावणाऱ्या एकता गंगाराम वारंगडे यांचा कार्यक्रमात मेडल, सन्मानचिन्ह तसेच कर्तृत्ववान खेळाडू प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने वातावरण आनंदमय झाले. विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना बक्षीस म्हणून साड्या व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच गावातील सुईणी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा शाल, तुळशीचे रोपटे, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य तसेच संस्थेच्या उपाध्यक्ष प्रीतम कुवरे यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच साई कृपा मंडळ, ग्रामउन्नती मंडळ, जोहार ग्रुप, ग्रामविकास मंडळ तसेच ग्रामस्थ व स्वयंसेवक यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती यामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महिला सशक्तीकरणाचा संदेश देत तसेच तारपा वाद्यावर महिलांनी नृत्य करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com