

मासिक पाळी स्वच्छतेसाठी महापालिकेचा पुढाकार
उंबार्ली शाळेत सॅनिटरी नॅपकिनची सुविधा
डोंबिवली, ता. १० : विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी आणि मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. उंबार्ली येथील केडीएमसी उर्दू शाळेत सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग आणि डिस्पोजल मशीन बसवण्यात आली असून, या सुविधेचे उद्घाटन महापौर ॲड. हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थिनींना शाळेतच सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध होतील आणि वापरलेल्या नॅपकिन्सची सुरक्षित विल्हेवाट लावण्याची सोयही आता उपलब्ध झाली आहे. मासिक पाळीमुळे मुलींच्या उपस्थितीवर किंवा शिक्षणावर कोणताही परिणाम होऊ नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्ट केले की, प्रशासनाचा मानस केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा आहे. या कार्यक्रमाला शिक्षण उपआयुक्त प्रसाद बोरकर, प्रशासन अधिकारी भारत बोरनारे, नगरसेविका नमिता मयूर पाटील आणि तेजस्वी गायकवाड यांच्यासह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसहभागातून राबवलेला हा उपक्रम शहरात सकारात्मक बदल घडवणारा ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
स्वच्छतेबाबत समुपदेशन
महापौर हर्षाली चौधरी यांनी म्हटले की, केवळ यंत्रे बसवून चालणार नाही, तर शिक्षकांनी विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांचेही मासिक पाळी स्वच्छतेबाबत समुपदेशन करणे आवश्यक आहे. समाजात या विषयाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हायला हवा. तर आयुक्त अभिनव गोयल यांनी म्हटले की, शिक्षण हा मुलींचा मूलभूत हक्क आहे. त्यात शारीरिक बदलांमुळे कोणतीही अडचण येऊ नये. खासगी शाळांनीही आपल्या स्तरावर अशा सुविधा सुरू कराव्यात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.