ठाण्यात ‘गोदा आरती’चा अनोखा आध्यात्मिक सोहळा..
ठाण्यात ‘गोदा आरती’चा अनोखा आध्यात्मिक सोहळा
ठाणे, ता. १० (बातमीदार) : मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी ठाणे शहरात दरवर्षी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा या उत्सवात आणखी एक विशेष आकर्षणाची भर पडणार आहे. ठाण्यात पहिल्यांदाच ‘गोदा आरती’चा भव्य सोहळा आयोजित करण्यात येत असून, ठाणेकरांना नाशिकच्या प्रसिद्ध परंपरेचा अनुभव आपल्या शहरात घेण्याची संधी मिळणार आहे.
हिंदू धर्मात गोदावरी नदीला अत्यंत पवित्र मानले जाते. नाशिकमधील रामकुंड परिसरात दररोज सायंकाळी पारंपरिक पद्धतीने होणारी गोदा आरती ही भाविकांसाठी मोठे आकर्षण असते. या आरतीच्या माध्यमातून नदीपूजन करून पर्यावरण संवर्धन आणि पवित्रतेचा संदेश दिला जातो. याच धर्तीवर ठाण्यातही हा आध्यात्मिक सोहळा साजरा करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून ठाणे शहरात गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त भव्य स्वागतयात्रेचे आयोजन केले जाते. यंदा या स्वागतयात्रेचे २६वे वर्ष साजरे केले जाणार आहे. यानिमित्ताने दरवर्षी गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधीपासून शहरात विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलावावर दीपोत्सव आणि तलावाच्या काठावर आरती करण्याची परंपरादेखील अनेक वर्षांपासून सुरू आहे. या दिवशी तलाव परिसरात हजारो दिव्यांची आरास केली जाते आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो. या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदा या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून गोदा आरतीचा समावेश करण्यात आला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये धार्मिक परंपरांबद्दल जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
ही भव्य गोदा आरती येत्या रविवार, १५ मार्चला सायंकाळी ७ वाजता पाचपाखाडी येथील कचराळी तलाव परिसरात पार पडणार आहे. या वेळी मंत्रोच्चार, शंखनाद आणि दीपप्रज्वलनासह पारंपरिक पद्धतीने आरती केली जाणार असून, यासाठी नाशिक येथील अनुभवी पुरोहित मंडळी ठाण्यात येणार आहेत. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

