खाकी वर्दीच्या स्वप्नाला गैरमार्गाचे गालबोट

खाकी वर्दीच्या स्वप्नाला गैरमार्गाचे गालबोट

Published on

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : खाकी वर्दी मिळवण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या हजारो तरुणांच्या गर्दीत शॉर्टकट शोधणाऱ्या चार उमेदवारांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ५२७ पदांसाठी सुरू असलेल्या नवी मुंबई पोलिस भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीदरम्यान उत्तेजक द्रव्य (स्टिरॉइड) घेतल्याच्या संशयावरून चार तरुणांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या तरुणांकडे सापडलेली रिकामी इंजेक्शन्स आणि सिरिंजमुळे भरती प्रक्रियेत खळबळ उडाली आहे.

कळंबोली येथील पोलिस मुख्यालय मैदानावर सध्या ५० हजार ४६० उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू आहे. मल्टिपर्पज हॉल परिसरात सोमवारी (ता. ९) उमेदवारांची उंची आणि छाती मोजण्याची प्रक्रिया सुरू असताना, चार तरुण संशयास्पद हालचाली करताना आढळले. पोलिसांनी तत्काळ त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ‘बीडी यू ४० इन्सुलिन’ची लाल रंगाची टोपण असलेली रिकामी इंजेक्शन्स आणि सिरिंज सापडली. झडतीदरम्यान प्रत्यक्ष या तरुणांकडे उत्तेजक द्रव्य सापडले नसले तरी त्यांच्याकडे सापडलेल्या रिकाम्या इंजेक्शन्सवरून त्यांनी उत्तेजक द्रव्ये टोचून घेतल्याचा दाट संशय निर्माण झाला आहे. त्यांनी खरोखरच कामगिरी सुधारण्यासाठी उत्तेजक द्रव्याचा वापर केला आहे का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्यांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे.

पोलिसांकडून तपास सुरू
पोलिस भरतीदरम्यान इंजेक्शन्स आणि सिरिंजसह सापडलेल्या आकाश नामदेव पानसरे (२१), सुयोग विलास ढोले (२१), सुनील बबन कडुस्कर (२४) आणि संकेत रामदास डोंगरे (३०) यांच्याविरोधात कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या तरुणांना ही इंजेक्शन्स कोणी पुरवली याचाही शोध घेतला जात आहे.

पोलिस भरती ही पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित आहे. अमली पदार्थांचा किंवा अनुचित मार्गाचा वापर करणाऱ्या उमेदवारांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. त्यांना भरती प्रक्रियेतून कायमचे बाद केले जाईल.
- संजयकुमार पाटील, पोलिस उपआयुक्त, मुख्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com