हिरव्या मिरचीवर ब्लॅक थ्रिप्सचे संकट !
हिरव्या मिरचीवर ‘ब्लॅक थ्रिप्स’चे संकट
उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीती, त्वरित उपाययोजना न झाल्यास संकट गडद होण्याचीही शक्यता
वाणगाव ता. १० (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात मिरची पिकांवर ‘ब्लॅक थ्रिप्स’ या फुलकिडीमुळे जिल्ह्यातील मिरची उत्पादकांवर संकट ओढवले आहे. मागील अनेक वर्षांपासून ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने उत्पादन प्रमाण घटू लागले आहे. यंदा मिरचीला चांगलाच भाव असल्याने बागायतदारांमध्ये आनंद होता. मात्र ब्लॅक थ्रिप्सने डोके वर काढल्यामुळे जिल्ह्यातील मिरची उत्पादकांच्या आनंदावर विरजण पडले असून, त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
पालघर जिल्ह्यात साधारणता एक हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर मिरची लागवड करण्यात आली असून, त्यापैकी डहाणू, कासा व वाणगाव या तीन मंडळांत एकूण १०७१.३५ हेक्टर क्षेत्रावर मिरचीचे उत्पादन घेतले जाते. मिरचीचा पट्टा ओळखल्या जाणाऱ्या वाणगाव, चिंचणी, धाकटी डहाणूसह पालघर तालुक्याच्या पश्चिम भागातील मिरची लागवड क्षेत्रावर ब्लॅक थ्रिप्सने शिरकाव केल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पूर्वी मिरचीचे उत्पादन हे मे ते जून महिन्यापर्यंत सुरू व्हायचे. परंतु मागील काही वर्षात डिसेंबर महिन्यापासून ब्लॅक थ्रिप्सचे संकट ओढवल्याने मे-जूनपर्यंत चालणारी मिरची आता मार्च-एप्रिल महिन्यातच काढणी होते. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यांतच ब्लॅक थ्रिप्स प्रादुर्भाव वाढल्याने गुंतवणूक केलेला खर्चदेखील मिळणार नसल्याने अनेक मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उभी मिरचीचे पीक अक्षरशः उपटून टाकले होते. यावर्षीही गतवर्षीची पुनरावृत्ती उद्भवू नये, यासाठी कृषी विभागाने वेळीच हालचाली करण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी विमा उतरवून लाखो रुपयांची जोखीम पत्करून गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला वाचविले पाहिजे, असे मागील २५ वर्षांचा मिरची पिकातील दांडगा अनुभव असलेले मिरची उत्पादक शेतकरी नीलेश पाटील यांनी सांगितले आहे.
दर आणि दर्जाचीही घसरण
वाणगावच्या मिरचीने मागील अनेक वर्षांत मुंबई, दादर, वाशी मार्केटसह परदेशातही ओळख निर्माण केलेली आहे.
वाणगाव भागातील मिरचीचा पट्ट्याला जगप्रसिद्ध ओळख निर्माण असून, वाणगावची मिरची मुंबई, वाशी, मार्केटसह परदेशातही निर्यात केली जाते. युरोप, दुबई, अमेरिका, सौदी अरेबिया अशा अनेक देशांमध्ये वाणगावच्या मिरचीची दरवर्षी निर्यात होते. सुरुवातीच्या टप्प्यात मिरचीला ५० ते ५५ रुपये प्रतिकिलो दर मिळत होता. मात्र मागणी वाढल्याने मागील काही दिवसांत हा दर थेट १३० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला होता. परंतु ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढल्याने मिरचीच्या क्वालिटीमध्ये घसरण झाली आहे. त्यातच मिरचीची परदेशात होणारी निर्यात थांबल्यामुळे बाजारभावातदेखील मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
ब्लॅक थ्रिप्सवर संशोधनाची गरज :
ब्लॅक थ्रिप्सचा वावर फुलकळीमध्ये असल्याने फवारणी केल्याने ब्लॅक थ्रिप्सपर्यंत कीटकनाशकाचा मारा पोहोचत नाही. त्यामुळे नियंत्रण मिळवणे शक्य होत नाही. जसा उन्हाळा वाढत जातो तसा ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो. ब्लॅक थ्रिप्स हा कोणत्याही औषधाने, कीडनाशकाने संपत नाही. ब्लॅक थ्रिप्स कोणत्याही परिस्थितीत आटोक्यात येत नसल्याने ब्लॅक थ्रिप्सवर संशोधन होण्यासाठी मागणी आता जोर धरू लागली आहे.
---------------
मी अनेक वर्षांपासून १० ते १५ एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड करीत आहे, परंतु मागील तीन ते चार वर्षांपासून मिरची पिकात ब्लॅक थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आम्ही मिरची उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झालो आहोत. अनेक कंपन्यांची औषधे वापरूनदेखील ब्लॅक थ्रिप्स आटोक्यात येत नसून, शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचवावे.
- महेश पाटील, मिरची उत्पादक, मथाणे, पालघर
-----------
डहाणू तालुक्यात मिरचीवर ब्लॅक थ्रिप्स या फुलकिडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. ब्लॅक थ्रिप्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी शास्त्रज्ञांच्या मदतीने जनजागृती करून प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांना मिरची पिकावरील ब्लॅक थ्रिप्स रोखण्यासाठी उपाययोजना आणि मार्गदर्शन मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशके, औषध अधिकृत कृषी निविष्ठा विक्री केंद्रामार्फत खरेदी करावीत.
- डॉ. जगन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

