कर्जतचा डॉक्टर माणगावला, गरोदर महिलांवर अन्याय

कर्जतचा डॉक्टर माणगावला, गरोदर महिलांवर अन्याय
Published on

गरोदर महिलांची परवड
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीतज्ज्ञ नसल्याने रुग्णांना त्रास
कर्जतचा डॉक्टर माणगावला; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
कर्जत, ता. ११ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील कर्जत उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीतज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने गरोदर महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कर्जतसाठी नेमण्यात आलेले स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मागील काही वर्षांपासून माणगाव येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवरील प्रसूतीतज्ञ डॉ. रामदास तरपेवाड यांना २०२३ साली उसनवारी तत्त्वावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र त्यांचा पगार कर्जत येथूनच सुरू असून ते दीर्घकाळ माणगाव येथेच कार्यरत आहेत. त्यामुळे कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सध्या कायमस्वरूपी स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध नाहीत.
कर्जत तालुका हा मोठ्या प्रमाणावर आदिवासी व ग्रामीण भाग असलेला तालुका आहे. येथील अनेक गरोदर महिलांची प्रसूती सरकारी रुग्णालयातच होत असते. मात्र प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्यास किंवा तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागल्यास तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. सध्या रुग्णालयात अशी सुविधा नसल्याने अनेक वेळा रुग्णांना खोपोली, उल्हासनगर किंवा इतर खासगी रुग्णालयात हलवावे लागते.
याशिवाय काही काळ येथे कार्यरत असलेल्या डॉ. स्वाती सरोदे यांनीही खासगी दवाखाना सुरू केल्याने सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता अधिकच प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे सध्या सिझेरियन प्रसूतीसाठी खोपोली किंवा कर्जत येथील खासगी डॉक्टरांना बोलावले जाते. गरीब व आदिवासी कुटुंबांसाठी हा अतिरिक्त खर्च आणि प्रवास मोठी अडचण ठरत आहे.
दरम्यान, कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय मस्कर यांनी ६ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय अलिबाग यांना पत्र पाठवून ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र आजपर्यंत प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आलेली नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
चौकट
प्रसूतीतज्ञाची तातडीची गरज
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गरोदर महिलांची नोंद होते. मात्र प्रसूतीतज्ञ डॉक्टर नसल्याने गुंतागुंतीच्या प्रसूती करणे शक्य होत नाही. त्यामुळे गरोदर महिलांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे. कर्जतसाठी नेमलेले डॉक्टर तातडीने परत बोलावून कायमस्वरूपी प्रसूतीतज्ञ नेमावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

कोट
२०२३ पासून डॉ.रामदास तरपेवाड हे माणगाव येथेच कार्यरत असल्याने कर्जत येथे गरोदर महिलांच्या सिझर डिलिव्हरी साठी खाजगी डॉक्टर बोलवावे लागतात. खाजगी डॉक्टर उपलब्ध न झाल्यास सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर अथवा पेशंटच्या नातेवाईकांच सल्ल्याने एमजीएम,कामोठे अथवा इतर खाजगी दवाखान्यात पाठवीत आहोत. या ठिकाणी प्रसूतीतज्ञ नेमणे गरजेचे आहे.
- दीपक आडकमोड, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कर्जत.

कर्जत हा आदिवासी बहुल तालुका आहे, उपजिल्हा रुग्णालयात आदिवासी समाजासह इतर समाजातील सुद्धा माता भगिनी यांच्या प्रसूती होत असतात. मात्र सध्या प्रसुतीतज्ञ डॉक्टर नसल्याने सिझर डिलिव्हरीसाठी उल्हासनगर अथवा कामोठे या ठिकाणी रूग्ण पाठवले जातात. यामध्ये प्रसूतिकला सोसणाऱ्या मातांची मोठी हेळसांड होत असते. येथील डॉक्टर माणगाव येथे कार्यरत ठेवण्यामागे रायगडाच्या बड्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा संशय आहे. याबाबत येथील स्थानिक महिलांना न्याय देण्याच्या दृष्टीने आदिवासी समाजाच्या वतीने मोठे आंदोलन उभारू .
- मालू निरगुडे, जिल्हाध्यक्ष आदिवासी समाज संघटना रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com