कृषी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात गरुड झेप
कृषी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात गरुडझेप
तृप्ती पाटील यांचा डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते सन्मान
वाणगाव, ता. ११ (बातमीदार) : जिल्ह्यातील महिला सबलीकरणासाठी गेली दोन दशके कार्यरत असलेल्या वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठान, आसनगाव या शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या कार्यकारी संचालिका तृप्ती पाटील यांचा पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठानच्या डिझाइन, फार्मसी, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी कार्यालयात पथनाट्य सादर केले. समाजात स्वावलंबी व बलशाली तरुणी घडविण्याचा संदेश पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला.
या वेळी पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपजिल्हाधिकारी विजया जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा महल्ले, शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, प्रतिमा संखे, डॉ. मीरा अधिकारी आणि जिल्ह्यातील कर्तव्यतत्पर महिला उपस्थित होत्या. तृप्ती पाटील यांनी डिझाइन (फॅशन) शाखेतून पदव्युत्तर पदवी उच्च श्रेणीतून (सुवर्ण पदक), तर कला शाखेतून इतिहास विषय निवडून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण ग्रामीण भागातच पूर्ण केले. याशिवाय त्यांनी सॉफ्टवेअर डिझाइनमध्ये डिप्लोमा केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला आणि मुलींच्या समस्या अगदी जवळून त्यांनी पाहिल्या. ग्रामीण भागातील पालकांची मानसिकता ओळखून जिल्ह्यातील महिला आणि आदिवासी समाजातील गरीब गरजू मुलींच्या पंखांना बळ देत, स्वतःच्या पायावर उभे करून रोजगारक्षम बनवावे हे ध्येय त्यांनी निश्चित केले.
बारावीनंतर येथील मुलींचे शिक्षण कसे पूर्ण करता येईल यावर त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केले. यासाठी त्या मुलींच्या पालकांचीही भेट घेत असत. आज त्यांच्या या प्रयत्नांमुळेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, सुरत, भिलाड, वापी, उंबरगाव, दमण, सिल्वासा, दादरा, नगरहवेली आणि नाशिकबरोबरच देशभरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी फार्मसी, डिझाइन, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.
गेल्या दोन दशकांपासून तृप्ती पाटील कृषी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि रोजगारक्षम बनवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांची दखल जिल्हास्तरावर घेण्यात आली असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या या मोलाच्या कार्याचा सन्मानही त्यांना प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात विविध क्षेत्रांत धडाडीने काम करणाऱ्या प्रभावी महिलांमध्ये तृप्ती पाटील यांचा समावेश करण्यात आला असून, महिला दिनानिमित्त त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यामुळे त्या इतर महिलांसाठीही प्रेरणादायी, आदर्श ठरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

