‘विराज प्रोफाइल’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
‘विराज प्रोफाइल’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
दहावी ते पदवीधर तरुणांसाठी रोजगार मेळावा
पालघर, ता. ११ (बातमीदार) : जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल आदी तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांना बोईसर येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत राज्यभरात आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या उपक्रमांतर्गत हा प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला आहे.
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून २०२५-२६ या आर्थिक वर्षात राज्यात एकूण एक हजार रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात २० रोजगार मेळावे आयोजित करण्याचा मानस जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने व्यक्त केला आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर, मॉडेल करिअर सेंटर पालघर आणि विराज प्रोफाइल लिमिटेड, बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (ता. १२) आणि शुक्रवारी (ता. १३) रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम विराज प्रोफाइल लिमिटेड वायर डिव्हिजन, जी-१/२, १/३ एमआयडीसी, बोईसर येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत पार पडणार आहे. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल आणि इतर तांत्रिक शाखेतील पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तसेच इच्छुक उमेदवारांनी प्रथम महा-स्वयम पोर्टलवर नोंदणी करून जॉब सीकर लॉगिनद्वारे डॅशबोर्डमध्ये जाऊन ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या पर्यायातून पालघर जिल्ह्यातील रोजगार मेळाव्याची निवड करून संबंधित रिक्त पदांसाठी ऑनलाइन पसंती नोंदवावी. तसेच उमेदवारांनी दोन प्रतीत बायोडाटा, फोटो, आधारकार्ड, सेवायोजना नोंदणी कार्ड तसेच शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची कागदपत्रे सोबत घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

