आरटीई प्रवेश प्रक्रिया १ किमी नियमाला स्थगिती

आरटीई प्रवेश प्रक्रिया १ किमी नियमाला स्थगिती

Published on

आरटीई प्रवेश प्रक्रियाच्या एक किमी नियमाला स्थगिती
अर्ज प्रक्रियेबाबत पालकांमध्ये संभ्रम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शालेय प्रवेश प्रक्रियेत शाळा निवडीसाठी लागू केलेल्या एक किमी अंतराच्या नियमाला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिल्यामुळे राज्यभरातील पालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयानंतर आधीच अर्ज भरलेल्या पालकांनी पुढे काय करायचे, अर्जात बदल करता येणार का किंवा नव्याने अर्ज भरावे लागणार का, याबाबत कोणतेच स्पष्टीकरण देण्यात आले नसल्यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
आरटीईअंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया १७ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवार (ता. १०) पर्यंत निश्चित केली होती. या कालावधीत राज्यभरातून सुमारे एक लाख अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी ठाणे जिल्ह्यातून सुमारे १९ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांमध्ये प्रामुख्याने शहरी भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळा निवडीसाठी तीन किमीच्या ऐवजी एक किमी अंतराच्या आतील शाळाच निवडण्याची अट घातली होती. या नियमामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शाळांची संख्या कमी होत असल्याची तक्रार होती. तसेच, शहरी भागातही काही पालकांना इच्छित शाळांची निवड करता येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे या नियमाला विविध स्तरांतून विरोध होत होता. या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठाने एक किमी अंतराच्या नियमाला स्थगिती दिल्यानंतर पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मार्गदर्शक सूचना जाहीर करा!
खंडपीठाच्या निर्णयानंतर पुढील प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाणार, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता देण्यात आलेली नाही. विशेषतः आधी भरलेल्या अर्जांमध्ये बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार का, की पालकांना पुन्हा नव्याने अर्ज भरावे लागणार, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मुदत वाढविण्याबाबतही अधिकृत संकेतस्थळावर अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने लवकरात लवकर स्पष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com