स्वीकृत नगरसेवकपदासाठी आश्वासने

स्वीकृत नगरसेवकपदासाठी आश्वासने
Published on

१० जागांसाठी १०० दावेदार
स्वीकृत नगरसेवकपदासाठी राजकीय खलबते
डोंबिवली, ता. ११ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या हाती आल्यानंतर आता ‘स्वीकृत नगरसेवक’ पदासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. पालिकेतील १० जागांसाठी तब्बल १०० हून अधिक दावेदार मैदानात उतरल्याने कोणाची वर्णी लावायची, यावरून पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. ‘एका जागेसाठी दहा इच्छुक’ अशा परिस्थितीमुळे स्थानिक नेत्यांना आता कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या सहा वर्षांपासून अनेक निष्ठावान कार्यकर्ते पालिकेत जाण्याचे स्वप्न पाहत होते; मात्र यंदा निवडणुका ‘पॅनेल’ पद्धतीने झाल्याने गणिते बदलली. बंडखोरी रोखण्यासाठी आणि इतर पक्षांतून आलेल्या ‘आयत्या’ उमेदवारांना सामावून घेण्यासाठी नेत्यांनी निष्ठावानांचे तिकीट कापले होते. त्या वेळी दिलेले स्वीकृत नगरसेवक करू हे आश्वासन आता नेत्यांच्या गळ्यातील फास बनले आहे. तिकीट कापलेले माजी नगरसेवक, निवडणुकीत माघार घेणारे उमेदवार आणि ऐनवेळी पक्षांतर केलेले नेते या पदासाठी सध्या जोरदार ‘लॉबिंग’ करत आहेत.

एकूण १० जागांचे वाटप लोकनियुक्त नगरसेवकांच्या संख्याबळानुसार होणार असून, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी चार जागा येण्याची दाट शक्यता आहे, अशी चर्चा सुरू आहे. तर एक जागा ठाकरे गटाला मिळण्याची चिन्हे आहेत. उर्वरित एका जागेवर अनेक पक्षांचा डोळा आहे. विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) ही संधी मिळू नये, यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.

कोरोना काळातील कार्याचा दाखला
अनेकांनी कोरोना संकटात घराघरात किराणा, औषधे पोहोचवणे, धूरफवारणी आणि रुग्णवाहिकांची सोय करणे अशा सामाजिक कामांच्या जोरावर या पदावर दावा ठोकला आहे. ‘‘आम्ही संकटात धावून आलो, आता पक्षाने आमचा विचार करावा,’’ असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.

‘वन इयर’ फॉर्म्युला?
इच्छुकांची वाढती संख्या आणि वाढता असंतोष पाहता सत्ताधारी पक्षांनी ‘एक वर्षाचा पॅटर्न’ राबविण्याचे संकेत दिले आहेत. म्हणजे एका स्वीकृत नगरसेवकाला केवळ एक वर्षाचा कार्यकाळ देऊन, पाच वर्षांत ५० कार्यकर्त्यांना संधी देण्याचा हा प्रयत्न असू शकतो. मात्र, पहिल्या फेरीत कोणाचा नंबर लागतो, यावरच आता कार्यकर्त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com