घरासाठी गिरणी कामगारांची विधान भवनला ऐतिहासिक धडक

घरासाठी गिरणी कामगारांची विधान भवनला ऐतिहासिक धडक

Published on

गिरणी कामगारांचा आझाद मैदानावर ऐतिहासिक मोर्चा
घराच्या हक्कासाठी लढा तीव्र करण्याचा इशारा

शिवडी, ता. ११ (बातमीदार) : रखडलेल्या गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर मंगळवारी (ता. १०) आझाद मैदानावर हजारो कामगार आणि त्यांच्या वारसांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाआंदोलन केले. आझाद मैदान येथे झालेला हा मोर्चा अभूतपूर्व ठरल्याचे आंदोलकांनी सांगितले.
गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे अध्यक्ष व आमदार सचिन अहिर यांनी आंदोलनाला संबोधित करताना, रखडलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा लढा विधानसभेत आणि रस्त्यावरही तेवढ्याच ताकदीने लढवू, असा इशारा दिला. स्वातंत्र्यलढा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत गिरणी कामगारांचे मोठे योगदान असून, त्यांना घराच्या हक्कापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सरकारने गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर निर्णय घेतला नाही, तर सभागृह चालू देणार नाही, असा इशारा दिला. ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनीही या प्रश्नावर सभागृहात सरकारवर दबाव आणला जाईल, असे सांगितले. तर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सरकारची इच्छाशक्ती असेल, तर हा प्रश्न सुटू शकतो, असे मत व्यक्त केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर टीका करत गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.
आंदोलनात कोकणपट्टी व पश्चिम महाराष्ट्रातील कामगार आणि वारसदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘घर नाही कुणाच्या बापाचे, ते आमच्या हक्काचे’, ‘ मुंबईतच घर मिळाले पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सेलू-वागणी येथील घर नको, मुंबईतच घर हवे, अशी मागणी आंदोलकांनी या वेळी केली.
तसेच संध्याकाळपर्यंत मंत्रालयाकडून चर्चेसाठी अधिकृत निमंत्रण न मिळाल्याने कामगारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, गिरणी कामगारांच्या घरबांधणीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा आणि वंचित कामगारांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशा मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. या आंदोलनाला विविध कामगार संघटना व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला. सरकारकडून सकारात्मक निर्णय होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
मंगळवारच्या आंदोलनात राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस आणि लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते, निवृत्ती देसाई, सर्व श्रमिक संघटनेचे अध्यक्ष कॉ. उदय भट, सरचिटणीस काँ. विजय कुलकर्णी, गिरणी कामगार सेनेचे अध्यक्ष संजय उभे, सरचिटणीस बाळ खवणेकर, हेमनधागा जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत गोसावी, लक्ष्मीकांत पाटील, संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे विवेकानंद बेलुसे, रमाकांत बने, एनटीसी कामगार असोसिएशनचे ॲड. बबन मोरे, प्रदीप लिंबारे, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे आनंद मोरे, सताप्पा पोवार, नथुराम निगावणे, मुंबई गिरणी कामगार युनियनचे ॲड. अरुण निंबाळकर, सातारा जिल्हा कामगार समितीचे दिलीप सावंत, गिरणी कामगार रोजगार आणि निवाराचे हेमंत राऊळ, कल्याण सेवाभावी संस्थेचे विजय चव्हाण इत्यादी कामगार नेते सामील झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com