

रेल्वे विकासात मानवी संवेदना!
बारवाई पाड्यासाठी उभारला स्वतंत्र पादचारी पूल; २५ घरांच्या वस्तीसाठी दुर्मिळ निर्णय
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पनवेल-कर्जत दुहेरी उपनगरी रेल्वे मार्गिकेच्या कामामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रूळ गावांच्या मधून गेले आहेत. अशाच एका ठिकाणी बारवाई येथील छोट्या आदिवासी पाड्यातील नागरिकांसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) उभारलेला पादचारी पूल संवेदनशीलतेचे उदाहरण ठरत आहे. अवघ्या २५ ते ३० घरांच्या या पाड्यासाठी स्वतंत्र पूल उभारण्याचा निर्णय भारतीय रेल्वेच्या इतिहासात दुर्मिळ मानला जात आहे.
पनवेल-कर्जत दुहेरी मार्गिका प्रकल्पामुळे बारवाई आदिवासी पाड्याच्या अगदी शेजारून रेल्वे रूळ गेले. परिणामी, पाड्याच्या पूर्वेकडील वस्ती आणि पश्चिमेकडील शेती क्षेत्र यांच्यातील संपर्क तुटला. शेती, जनावरांची देखभाल आणि दैनंदिन हालचालींसाठी पाड्यातील नागरिकांना रेल्वे मार्ग ओलांडण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. ही अडचण लक्षात घेऊन मुंबई रेल्वे विकास महामंडळाने स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी येथे विशेष पादचारी पूल उभारला. त्यामुळे आता पाड्यातील नागरिकांना सुरक्षितपणे रेल्वे मार्ग ओलांडून आपल्या शेतात जाता येत आहे.
या पाड्यातील बहुतेक कुटुंबे कातकरी, आदिवासी समाजातील असून त्यांचा मुख्य व्यवसाय शेतीमजुरी आणि अल्प प्रमाणातील शेती हा आहे. या पुलामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील मोठी अडचण दूर झाली आहे. भारतीय रेल्वेत सहसा मोठ्या स्थानकांवर किंवा वर्दळीच्या ठिकाणी पादचारी पूल उभारले जातात; मात्र अवघ्या पंचवीस घरांच्या छोट्या आदिवासी वस्तीसाठी पूल उभारण्याचा निर्णय हा रेल्वे प्रशासनाच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.
संवेदनशील विकासाची नोंद
पनवेल-कर्जत उपनगरी मार्गिका प्रकल्पामुळे भविष्यात या परिसरातील रेल्वे सेवा अधिक सक्षम होणार आहे; मात्र या विकासासोबत स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचीही काळजी घेतली जात असल्याचे बारवाई पाड्यावरील हा पूल अधोरेखित करतो. लहानशा आदिवासी पाड्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा हा पूल रेल्वे विकासासोबत मानवी संवेदनाही जपल्या जात असल्याची जाणीव करून देतो.
प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण
नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा पनवेल-कर्जत उपनगरी कॉरिडॉर हा सुमारे २९.६ किलोमीटर लांबीची दुहेरी रेल्वे मार्गिका आहे. या मार्गावर पनवेल, चिकले, मोहोपे, चौक आणि कर्जत अशी स्थानके उभारली जात आहेत. प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित तांत्रिक कामे सुरू आहेत. हा प्रकल्प एमआरव्हीसीमार्फत राबविण्यात येत असून पूर्ण झाल्यानंतर त्याचे संचालन मध्य रेल्वेकडे सोपविण्यात येणार आहे.
पनवेल-कर्जत रेल्वे प्रकल्प एका नजरेत
- मार्ग लांबी : २९.६ किमी (दुहेरी मार्ग)
- एकूण खर्च : २,७८२ कोटी रुपये
- स्थानके : ५
- स्थानके : पनवेल, चिखले, पोयंजे (मोहोपे), चौक, कर्जत
- बोगदे : ३ (एकूण ३,२०६ मीटर)
- पूल : ४७
- रोड ओव्हर ब्रिज : ५
- रोड अंडर ब्रिज : १५
- सबवे : ५
- प्रकल्प प्रगती : ९५ टक्के काम पूर्ण
मुख्य आदिवासी पाडा : बारवाई
- घरांची संख्या : २५ ते ३०
- मुख्य व्यवसाय : शेती, शेतीमजुरी, लहान पशुपालन
- समस्या : रेल्वे रुळामुळे पूर्व-पश्चिम भागातील संपर्क तुटलेला
- उभारलेले पादचारी पूल : १
- उद्दिष्ट : शेतात जाण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करणे
- सामाजिक संवेदनशीलता : छोट्या पाड्यासाठी स्वतंत्र पूल उभारण्याचे दुर्मिळ उदाहरण
- परिणाम : नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील मोठी अडचण दूर
बारवाईसारख्या छोट्या आदिवासी पाड्यांसाठी स्वतंत्र पादचारी पूल उभारणे, ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची बाब होती. या पाड्यातील नागरिकांना शेतीसाठी किंवा रोजच्या कामांसाठी रेल्वे रूळ ओलांडताना धोका होऊ नये, यासाठी आम्ही या विशेष पुलाची उभारणी केली. हे आमचे सामाजिक बांधिलकीचे आणि स्थानिकांसाठीच्या जबाबदारीचे उदाहरण आहे. आम्हाला आशा आहे, की हा प्रयत्न पाड्यातील लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल.
- योगेश शर्मा, प्रकल्प व्यवस्थापक, एमआरव्हीसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.