परदेशात नोकरीचे प्रलोभन दाखवून लाखोंचा गंडा

परदेशात नोकरीचे प्रलोभन दाखवून लाखोंचा गंडा

Published on

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : परदेशात जहाजावर मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून सुशिक्षित तरुणांची लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार सीवूड्स परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी डीएलएस मरीन सोल्यूशन एलएलपी कंपनीचा मालक आशीष घोडके उर्फ काळे याच्यासह सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

आशीष घोडके याने ऑगस्ट २०२५ मध्ये नेरूळ येथील हावरे सेन्च्युरीयन मॉलमध्ये डीएलएस मरीन सोल्यूशन एलएलपी नावाचे कार्यालय सुरू केले होते. त्यानंतर त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी परदेशात जहाजावर मोठ्या पगाराची नोकरी लावण्याबाबतची जाहिरातबाजी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी काही एजंटदेखील नेमले होते. रबाळे येथील अनुपम चौहान (वय २४) याला नोकरीची आवश्यकता असल्याने त्याने एजंटच्या माध्यमातून या टोळीला संपर्क साधला होता. त्या वेळी या टोळीने अनुपम याला इस्तंबूल, तुर्की येथे जहाजावर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच त्याला ७०० यूएस डॉलर पगार आणि विमानाचे तिकीट देण्याचे कबूल करून त्याच्याकडून वेगवेगळ्या टप्प्यांत दोन लाख २० हजार रुपये उकळले. त्यानंतर या टोळीने त्याला विमानतळावर जाण्यास सांगितले. त्यानुसार अनुपम मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर कंपनीने तांत्रिक कारणे पुढे करून त्याला पुन्हा घरी पाठवले.

काही दिवसांनी त्याने कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली असता, ते बंद असल्याचे आणि इतर अनेक तरुणांची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. केवळ अनुपमच नव्हे, तर अनेक तरुणांकडून या टोळीने साधारण ११ लाख ४० हजार रुपये लुबाडून पलायन केल्याचे आढळून आले. त्यानंतर फसवणूक झालेल्या या तरुणांनी नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी डीएलएस मरीन सोल्युशन एलएलपी कंपनीचा मालक आशीष घोडके याच्यासह रोहित, योगेश विनोद कुमार, अजित सिंग नवीन, एजंट राघव व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com